Pune : नगरसेवक दीपक मानकर यांच्यावर मोक्का अंतर्गत कारवाई; 5 दिवसांची पोलीस कोठडी

जितेंद्र जगताप आत्महत्या प्रकरण

एमपीसी न्यूज – जितेंद्र जगताप आत्महत्या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आलेले माजी उपमहापौर आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक दीपक मानकर यांच्यावर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. पोलिसांनी त्यांना आज न्यायालयात हजर केले असता विशेष न्यायाधीश ए.एस.महात्मे यांनी पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. न्यायालयात सरकारी वकील अॅड. उज्ज्वला पवार यांनी सरकार पक्षाच्या वतीने बाजू मांडली. तर मानकर यांच्या बाजूने अॅड. सुधीर शहा आणि अॅड.चिन्मय भोसले यांनी युक्तीवाद केला.

गुन्हा दाखल झाल्यानंतर दीपक मानकर फरार झाले होते. अटकपूर्व जामीन मिळावा यासाठी त्यांनी पुणे सत्र न्यायालय, मुंबई उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. परंतु या तीनही न्यायालयांनी अटकपूर्व जामीन फेटाळले आणि सर्वोच्च न्यायालयाने त्यांना दहा दिवसात पोलिसांपुढे शरण जाण्यास सांगितले. त्यानुसार मानकर आज (1 ऑगस्ट) सकाळी पोलिसांमध्ये हजर झाले.

दीपक मानकर यांच्याकडे काम करणा-या जितेंद्र जगताप यांनी 2 ऑगस्ट रोजी रेल्वेखाली उडी घेऊन आत्महत्या केली होती. आत्महत्येपूर्वी त्यांनी चिठ्ठी लिहून ठेवली असून दीपक मानकर आणि बांधकाम व्यावसायिक सुधीर कर्नाटकी यांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करत असल्याचे लिहिले होते. त्यानंतर मानकर यांच्यासह विनोद भोळे, सुधीर सुतार, अमित तनपुरे, अतुल पवार आणि विशांत कांबळे, नाना कुदळे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.