Talegaon : अधिकाऱ्याशी खडाजंगीनंतर नगरसेवकाविरुद्ध गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – तळेगाव दाभाडे येथील नगरसेवक अमोल जगन्नाथ शेटे व सहाय्यक अग्निशमन स्थानक पर्यवेक्षक पद्मनाभ सुधीर कुल्लरवार यांच्यात जोरदार शाब्दीक खडाजंगी झाली. त्यानंतर शेटे यांच्यावर शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

नगर परिषदेचे सहाय्यक अग्निशमन स्थानक पर्यवेक्षक पद्मनाभ सुधीर कुल्लरवार(वय 34)यांनी शेटे यांच्या विरोधात येथील पोलीस ठाण्यात शुक्रवारी फिर्याद दिली.

फिर्यादीत म्हटले आहे की, बुधवारी (दि. 31) दुपारी साडेबाराच्या सुमारास नगराध्यक्षांच्या केबिनमध्ये तीन ते चार नगरसेवकांसमक्ष अमोल शेटे यांनी कारण नसताना दमदाटी करून अपमानास्पद वागणूक दिली. अमोल शेटे हे नेहमीच मानसिक त्रास देतात.

वस्तुस्थिती काय आहे, याची खात्री केल्यानंतरच अमोल शेटे यांच्यावर योग्य ती कारवाई केली जाईल, अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक भानुदास जाधव यांनी दिली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक कमलाकर भोसले करीत आहे. अमोल शेटे हे नगरपरिषदेतील सत्तारूढ भाजपचे नगरसेवक आणि अर्थ व  नियोजन समितीचे सभापती आहेत.

यासंदर्भात अमोल शेटे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, “नगरपरिषदेचा अग्निशामक बंब 30 जुलै रोजी चाकण येथे झालेल्या दंगलीत जळाला आहे. हा बंब अर्धवट जळाला असल्याने त्याचा सध्या काहीच उपयोग होत  नाही. नागरिकांच्या जीवनाशी निगडित असलेल्या या प्रश्नावर पर्याय काढण्यासाठी आणि इतर महत्वांच्या विषयावर नगराध्यक्षा चित्रा जगनाडे, उपनगराध्यक्ष संग्राम काकडे, आरोग्य समितीचे सभापती अरुण भेगडे पाटील, नगरसेवक संतोष शिंदे आणि मी स्वतः नगराध्यक्षांच्या केबिनमध्ये चर्चा करीत होतो. थोर समाजसेवक नथुभाऊ भेगडे पाटील शाळेच्या प्रांगणात 10 ते 15 नोव्हेंबर या दरम्यान ‘जाणता राजा’ हे महानाट्य होणार आहे. नजीकच फटाका स्टॉल्स आहेत. या महानाट्यास दररोज 10 ते 12 हजार प्रेक्षक उपस्थित असतील. जाणताराजा आणि दीपावली सणाच्या पार्श्वभूमीवर आपत्कालीन परिस्थिती उदभवल्यास अग्निशमन बंबाची पर्यायी व्यवस्था असणे गरजेचे आहे.

या बाबत पर्यायी व्यवस्था काय केली आणि जळालेल्या बंबाची इन्शुरन्स बाबत अद्ययावत माहिती घेण्यासाठी नगराध्यक्षा चित्रा जगनाडे यांनी पद्मनाभ कुल्लरवार यांना केबिनमध्ये  बोलावले. यावेळी पद्मनाभ यांच्याकडे अग्निशमन बंबाच्या इन्शुरन्स कागदपत्रांची मागणी केली असता, काय नाटक लावले आहे तुम्ही, तुम्ही काय थेरं करताय, काम तर काहीच करीत नाही, असे उद्धट बोलून कुल्लरवार यांनी लोकप्रतिनिधींना अपशब्द वापरले. नागरिकांच्या जीवनाशी निगडीत असलेला हा महत्त्वाचा प्रश्न वेळेत मार्गी लागणे गरजेचे असताना पद्मनाभ हे कामात हलगर्जीपणा करतात. मुख्याधिकारी वैभव आवारे यांच्याकडेही पद्मनाभ कुल्लरवार यांच्याविषयी गंभीर तक्रारी आल्या आहेत. सर्वसामान्य नागरिकांच्या जीवनाशी निगडीत असलेल्या महत्वाच्या कामाचा लोकप्रतिनिधींनी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडे  पाठपुरावा करणे म्हणजे शासकीय कामात अडथळा केला असे होत नाही.”

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.