Pimpri: ‘नगरसेवक हा वॉर्डातील मंत्री असतो’, नगरसेविकेचा फोन ‘रेकॉर्ड’ करणाऱ्या अधिकाऱ्याला निलंबित करा; महापौरांचा आयुक्तांना आदेश

नगरसेवकावर प्रभागाची संपूर्ण जबाबदारी असते. नगरसेविकेचा फोन रेकॉर्ड करुन दुसऱ्या नगरसेवकाला ऐकवणे अतिशय चुकीचे आहे.

एमपीसी न्यूज – नगरसेवक हा वॉर्डातील मंत्री असतो. त्याच्यावर प्रभागाची संपूर्ण जबाबदारी असते. नगरसेविकेचा फोन रेकॉर्ड करुन दुसऱ्या नगरसेवकाला ऐकवणे अतिशय चुकीचे आहे. नगरसेविकेचा फोन रेकॉर्ड करणाऱ्या अधिकाऱ्या ला तत्काळ निलंबित करा, असा आदेश महापौर उषा ढोरे यांनी पालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना दिला आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या मागील दोन महिन्याच्या तहकूब सर्वसाधारण सभा आज (शुक्रवारी) होत आहे. महापौर उषा ढोरे सभेच्या अध्यस्थानी आहेत.

सभेच्या सुरुवातीला भाजपच्या संत तुकारामनगर मधील नगरसेविका सुजाता पालांडे यांनी आपल्याला आलेला अनुभव सभागृहात सांगितला. प्रभागातील कामे होत नाहीत.

अधिकारी कामाला टाळाटाळ करत आहेत. कामांसाठी कनिष्ठ अभियंत्याला फोन केला असता अधिका-यांने फोन रेकॉर्ड केला. तो फोन दुस-या नगरसेवकाला ऐकवल्याचे त्यांनी सांगितले. तसेच या अधिका-यावर कारवाईची मागणी त्यांनी केली.

त्यानंतर दापोडीच्या भाजप नगरसेविका आशा शेंडगे यांनी आपला अनुभव शेअर केला. स्मार्ट सिटीअंतर्गत प्रभागात विकासकामे सुरु आहेत. त्याची कोणतीही माहिती दिली जात नाही. ठेकेदाराकडून दादागिरीची भाषा केली जाते. अशा ठेकेदारांवर कडक कारवाईची मागणी त्यांनी केली.

याप्रकरणी सभागृह नेते नामदेव ढाके यांनी कारवाई करण्याचे आदेश आयुक्तांना देण्याची मागणी महापौरांकडे केली.

सुरुवातीला महापौर ढोरे कारवाई करण्याचा आदेश देण्यास तयार होत नव्हत्या. त्यामुळे नगरसेवकांनी आक्रमक भूमिका घेतली.

त्यावर नगरसेवक हा वॉर्डातील मंत्री असतो. त्याच्यावर प्रभागाची संपूर्ण जबाबदारी असते. नगरसेविकेचा फोन रेकॉर्ड करुन दुस-या नगरसेवकाला ऐकवणे अतिशय चुकीचे आहे. नगरसेविकेचा फोन रेकॉर्ड करणा-या अधिका-याला तत्काळ निलंबित करा, असा आदेश महापौर ढोरे यांनी आयुक्त हर्डीकर यांना दिला.

पण, स्मार्ट सिटीच्या ठेकेदाराच्या तक्रारींवर महापौर ढोरे यांनी कोणतेही भाष्य केले नाही. त्यामुळे स्मार्ट सिटीच्या ठेकेदाराला पाठिशी घातले जात आहे का, असा सवाल केला जात आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.