Chinchwad News : प्रसन्नकडून चुकून गोळी झाडली गेली ? पोलीस करतायेत तपास

नगरसेविका करुणा चिंचवडे यांच्या मुलाची आत्महत्या की अपघात ?

एमपीसी न्यूज – भाजप नगरसेविका करुणा चिंचवडे यांच्या मुलाने स्वतःवर गोळी झाडून घेतली. त्यात मुलाचा उपचारादरम्यान रुग्णालयात मृत्यू झाला. ही घटना रविवारी (दि. 28) रात्री चिंचवड गावात घडली. मात्र ही आत्महत्या आहे की अपघात याबाबत पोलीस शोध घेत आहेत.

प्रसन्न शेखर चिंचवडे (वय 21, रा. चिंचवड) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चिंचवडे यांच्या घरात नवीन कार घेण्याची चर्चा सुरू होती. प्रसन्न रविवारी सकाळी होळीच्या मुहूर्तावर नवीन कार घेण्यासाठी शोरूममध्ये जाऊन आला होता. रविवारी रात्री सव्वानऊ वाजता तो त्याचे वडील शेखर चिंचवडे यांचे परवानाधारक पिस्तुल पाहत होता. कुटुंबियांना अचानक गोळी झाडल्याचा आवाज आला.

प्रसन्नच्या कुटुंबीयांनी प्रसन्नकडे धाव घेतली असता तो रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. त्याला पिस्तूलातून सुटलेली गोळी लागल्याने तो गंभीर जखमी झाला होता. त्याला तात्काळ उपचारासाठी थेरगाव येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र रविवारी रात्री उशिरा त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

प्रसन्नकडून चुकून गोळी झाडली गेली असल्याचे कुटुंबियांचे म्हणणे आहे. प्रसन्नने आत्महत्या केली की त्याच्यासोबत अपघात झाला, याबाबत चिंचवड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.