Bhosari News : नगरसेवक रवी लांडगे यांच्या नेतृत्वात महावितरण कार्यालयावर हजारोंचा मोर्चा

एमपीसी न्यूज – भोसरी परिसरात वारंवार होत असलेल्या खंडीत वीजपुरवठ्याच्या विरोधात नगरसेवक रवी लांडगे आणि सामाजिक कार्यकर्त्या सोनाली संजय उदावंत यांनी महाजन आंदोलनाच्या माध्यमातून हजारो नागरिकांचा विशाल मोर्चा आज (गुरुवारी) बालाजीनगर येथील महावितरणच्या कार्यालयावर काढला.

गेल्या काही महिन्यांपासून भोसरीच्या सर्वच भागात विजेचा लपंडाव सुरू आहे. तासन्‌तास वीज गायब होत असल्याने नागरिक हैराण झाले आहेत. व्यापारी मेटाकुटीला आले आहेत. याप्रकरणी महावितरणच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांकडे अनेकदा तक्रारी करूनही वारंवार वीज पुरवठा खंडीत होत आहे. त्यामुळे महावितरणबाबत भोसरीतील नागरिकांमध्ये संतापाची भावना आहे.

वारंवार खंडित होणा-या विद्युत पुरवठ्याचा जाब विचारण्यासाठी महावितरणच्या विरोधात नगरसेवक रवी लांडगे आणि सामाजिक कार्यकर्त्या सोनाली उदावंत यांनी भोसरी, बालाजीनगर, गवळीमाथा येथील महावितरणच्या कार्यालयावर आज गुरूवारी महाजनआंदोलन करण्याची हाक दिली होती. त्याला साथ देत भोसरीतील हजारो नागरिक कै. अंकुशराव लांडगे नाट्यगृहाजवळील मोकळ्या मैदानावर जमा झाले. तेथून बालाजीनगर, गवळीमाथा येथील महावितरणच्या कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.

नगरसेवक रवी लांडगे, सामाजिक कार्यकर्ते संजय उदावंत, राष्ट्रवादीचे नगरसेवक अजित गव्हाणे, प्रवीण लांडगे, मंगेश आंबेकर यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना मागणीचे निवेदन दिले.  अधिकाऱ्यांनी भोसरीतील विजेचा लपंडाव थांबवण्यासाठी ट्रान्सफार्मरची क्षमता वाढवण्याचे तसेच नादुरूस्त मिनी बॉक्स तातडीने बदलण्याचे आश्वासन शिष्टमंडळाला दिले. या आश्वासनाची लवकरात-लवकर पूर्तता करावी. अन्यथा आणखी तीव्र आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.