Pimpri News : मतदार यादीतून नगरसेवकाचेच नाव वगळले!

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवडचे माजी उपमहापौर, राष्ट्रवादीचे विद्यमान नगरसेवक डब्बू आसवाणी यांचे मतदार यादीतून नाव वगळल्याचा प्रकार आज (मंगळवारी) समोर आला आहे. आठ दिवसांपूर्वी मतदार यादीत असलेले नाव अचानक वगळण्यात आले. मी पंधरा वर्षांपासून नगरसेवक असताना माझे नाव वगळले आहे. मतदार यादीमधून कोणी, कशासाठी आणि कोणत्या कारणासाठी माझे नाव वगळले. याचा तपास करावा आणि संबंधितांवर योग्य ती कायदेशीर कारवाईची मागणी नगरसेवक आसवाणी यांनी केली.

महापालिकेची निवडणूक फेब्रुवारी 2022 मध्ये होणे अपेक्षित आहे. त्यासाठी मतदार नोंदणी सुरु आहे. मतदार नोंदणीची आज अंतिम तारीख होती. पिंपरी कॅम्पचे सलग 15 वर्षे महापालिकेत प्रतिनिधीत्व करत असलेल्या डब्बू आसवाणी यांचे मतदार यादीत नाव होते. आठ दिवसांपूर्वीही त्यांनी तपासले असता नाव होते. पण, आज त्यांनी पुन्हा मतदार यादी तपासली. त्यावेळी यादीतून नाव वगळल्याचे आढळून आले.

याबाबत महापालिका निवडणूक विभाग, जिल्हाधिकारी, पिंपरी विधानसभा मतदार संघाचे मतदार नोंदणी अधिकारी यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी तपासले. त्यातही माझे नाव वगळल्याचे दिसून आले. पुन्हा फॉर्म भरता येईल. पण, नाव का वगळले, कोणी वगळले, संबंधितांवर गुन्हा दाखल करावा. राजकारण सुरु झाले आहे. आठ दिवसांपूर्वी असलेले नाव आज अचानक वगळले. मी आज नाव तपासले नसते तर मला घरीच बसावे लागले असते. नाहक मी मतदानापासून वंचित राहिलो असतो, असे आसवाणी म्हणाले.

कोणीतरी जाणीवपूर्वक मतदारयादी मधून माझे नाव वगळले आहे. नाव वगळल्याचे लक्षात आल्यावर मी लगेच मतदार यादीत नाव समावेश करावा म्हणून ऑनलाईन फॉर्म भरला. त्याचा संदेश (ओटीपी) व रेफरन्स आयडी मला मिळाला आहे. मी पंधरा वर्षे नगरसेवक आहे. शहराचा उपमहापौर, स्थायी समिती अध्यक्ष म्हणून काम केले.

असे असताना कोणतेही कारण नसताना लोकप्रतिनिधीचे नाव मतदार यादीतून वगळले जात असेल तर हे धक्कादायक आहे. निवडणुकीच्या तोंडावर नाव वगळणे अत्यंत चुकीचे आहे. मतदार यादीमधून कोणी, कशासाठी आणि कोणत्या कारणासाठी माझे नाव वगळले. याचा तपास करावा आणि संबंधितांवर योग्य ती कायदेशीर कारवाईची मागणी नगरसेवक आसवाणी यांनी केली. याबाबत महापालिकेच्या निवडणूक विभागाच्या प्रमुखाला निवेदन दिले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.