Pune : रुग्णाला दिलेल्या सुपात आढळले रक्ताने माखलेले कापसाचे बोळे!

पुण्यातील नामांकित जहाँगिर रुग्णालयातील प्रकार

एमपीसी न्यूज – रुग्णाला दिलेल्या सुपामध्ये रक्ताने माखलेले कापसाचे बोळे आढळल्याचा प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे हा प्रकार पुण्यातील नावाजलेल्या जहाँगिर रुग्णालयात घडला आहे. या प्रकारामुळे रुग्णालय प्रशासन आणि कर्मचा-यांचा निष्काळजीपणा दिसून आला आहे. रुग्णाचे पति महेश सातपुते यांनी याप्रकरणी कोरेगाव पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. 

महेश सातपुते हे पुण्यात राहत असून त्यांच्या पत्नीला बाळंतपणासाठी दि. 29 एप्रिलला दाखल करण्यात आले होते. त्यांना त्याच दिवशी सायंकाळी एक मुलगी झाली. यामुळे सातपुते पती-पत्नी मोठ्या आनंदात होते. दुस-या दिवशी सातपुते यांना डॉक्टरांनी दिलेल्या सल्ल्यानुसार रुग्णालय प्रशासनाकडून सूप देण्यात आले. थोडे सूप पिल्यानंतर त्यांना सुपात कापसाचे बोळे आढळले. हे कापसाचे बोळे रक्ताने माखलेले असल्यामुळे त्यांना या किळसवाण्या प्रकाराचा जबर धक्का बसला. त्यांनी हे महेश सातपुते यांना दाखवले.

रुग्णालय प्रशासनाच्या अशा बेजबाबदार आणि निष्काळजीपणामुळे महेश यांंनी या प्रकारासाठी प्रशासनाला आणि डॉक्टरांना जाब विचारला. तसेच कोरेगाव पोलीस ठाण्यात तात्काळ तक्रार दिली. जहाँगिर रुग्णालयात यापूर्वीही कर्मचा-यांच्या बेजबाबदारपणामुळे अशा प्रकारच्या घटना घडल्या आहेत. मात्र, जहांगीर प्रशासनाने याकडे साफ कानाडोळा केला आहे.

याप्रकरणी जहाँगिर रुग्णालयाच्या मुख्य जनसंपर्क अधिकारी आरती इराणी म्हणाल्या की, अद्याप तरी हा प्रकार कोणाच्या चुकीमुळे घडला आहे, हे सांगता येणार नाही. पोलिसांनी अज्ञात व्यक्तिविरोधात गुन्हा दाखल केला आहे. चौकशीत दोषी आढळणा-यांवर योग्य ती कारवाई करण्यात येईन.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.