Pimpri: लाभार्थ्यांनी शिवण मशीनच्या अनुदानासाठी सादर केल्या बनावट पावत्या

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या महिला व बालकल्याण योजने अंतर्गत शिवण मशीन देण्याची योजना असून या  योजने अंतर्गत पात्र लाभार्थ्यांना  सहा हजारांचे अनुदान देण्यात येते. परंतू, अनुदानासाठी अर्ज केलेल्या लाभार्थ्यांनी जीएसटीच्या बनावट पावत्या सादर केल्याचे  निदर्शनास आले आहे. त्यामुळे लाभार्थ्यांनी प्रत्यक्ष मशीन खरेदी करून जीएसटीची खरी पावती सादर करावी, असे आवाहन नागर वस्ती विभागाच्या सहाय्यक आयुक्त स्मिता झगडे यांनी केले आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या महिला व बालकल्याण योजने अंतर्गत महिलांना स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी व व्यवसायासाठी प्रोत्साहन देण्यासाठी विविध योजना राबविण्यात येतात. त्याअनुशंगाने आर्थिक दुर्बल घटकातील महिलांना शिवण मशीन खरेदीसाठी सहा हजार रूपयांचे अनुदान देण्यात येत आहे. लाभार्थी महिलांनी शिवण मशीन खरेदी करून बीलाची पावती सादर करणे बंधनकारक आहे. परंतू, बिलाच्या सादर केलेल्या पावत्यांमध्ये अनेक बनावट पावत्या असल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे.

त्यामुळे पात्र लाभार्थ्यांनी  प्रत्यक्ष मशिन खरेदी करुन जीएसटी बिलाची खरी पावती नागरवस्ती विभागास सादर करावी. तसेच  जीएसटी क्रमांक बरोबर असल्याची दुकानदाराकडून खात्री करुन घ्यावी. अन्यथा लाभार्थींना शिवण मशीनचे अर्थसहाय्य मिळण्यापासून वंचित राहील. त्याला सर्वस्वी लाभार्थींच जबाबदार राहणार असून पालिकेची जबाबदारी राहणार नाही, असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.