Pune News : ‘हॉस्पिटलमध्ये येणाऱ्या पेशंटचा वास येतो, आम्हाला कोरोना होईल’ डॉक्टरला जातीवाचक शिवीगाळ करणाऱ्या दाम्पत्यावर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज : रहिवासी भागात असलेल्या हॉस्पिटल मध्ये येणाऱ्या पेशंटचा वास येतो, त्यामुळे आम्हाला कोरोना होईल असे सांगून डॉक्टरला जातीवाचक शिवीगाळ करणाऱ्या महिलेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लोणी काळभोर पोलीस स्टेशनच्या हद्दीत हा प्रकार घडला. 

या प्रकरणी ज्योती विकास बनसोडे यांनी तक्रार दिली असून निवृत्ती आंबेकर आणि मिनाबाई आंबेकर या दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लोणी काळभोर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील आंबेकर वस्ती मारुती नगर येथे हा प्रकार घडला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीचे पती हे डॉक्टर आहेत. आंबेकर वस्ती परिसरात त्यांचा दवाखाना आहे. दवाखान्याच्या वर ते राहण्यासाठी आहेत. दरम्यान आरोपी हे देखील त्याच परिसरात राहतात. फिर्यादी आणि त्यांच्या पतीला उद्देशून यांचे पत्र्याचे शेड काढून टाका, त्या ठिकाणी येणार्‍या लोकांची दुर्गंधी येत आहे, त्यामुळे आम्हाला कोविड आजार होईल, आमच्या भागात खूप घाण आली आहे असे म्हणत रुग्णालयात हजर असलेल्या पेशंट समोर त्यांना जातीवाचक शिवीगाळ केली.

तसेच वेळोवेळी अपमान करून रुग्णालयासमोर कचरा आणून टाकला. दरम्यान तक्रार आल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून लोणी काळभोर पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.