Covid 19 Test New Rates: राज्यात खासगी प्रयोगशाळांमध्ये आता होणार 1200 रुपयांमध्ये कोरोना चाचणी

एमपीसी न्यूज – आता नव्याने निश्चित केलेल्या दरानुसार कोविड 19 चाचण्यांसाठी 1200, 1600 आणि 2,000 रुपये असे कमाल दर आकारण्यास खासगी प्रयोगशाळांना बंधनकारक करण्यात आले आहे. यापेक्षा अधिक दर खासगी प्रयोगशाळांना आकारता येणार नाही, अशी घोषणा राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज केली. 

महिन्याभरापूर्वी चाचण्यांच्या दरांमध्ये सुधारणा करण्यात आली होती त्यानंतर यासाठी नेमण्यात आलेल्या समितीने केलेल्या शिफारशीनुसार आता पुन्हा एकदा कमाल दर निश्चित करण्यात आले आहेत. यापूर्वी 1900, 2200 आणि 2500 रुपये असे कमाल दर आकारण्यास परवानगी होती.

सॅम्पल घेऊन त्याची वाहतूक आणि सॅम्पलचे रिपोर्टींग त्याकरिता 1900 रुपयांऐवजी 1200 रुपये आकारण्यात येईल. तर स्वॅब कलेक्शन सेंटर, कोरोना केअर सेंटर्स, क्वारंटाईन सेंटरमधील येथून स्वॅब घेतल्यास 2200 रुपयांऐवजी 1600 रुपये आणि रुग्णाच्या घरी जाऊन स्वॅब घेतल्यास 2,500 रुपयांऐवजी 2,000 रुपये सुधारीत दरानुसार आकारण्यात येणार आहेत.

सामान्यांना दिलासा देण्यासाठी कोरोना चाचण्यांचे दर पुन्हा एकदा कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला असून नव्या निर्णयानुसार राज्यात कोरोना चाचणी मागे 700 रुपये कमी करण्‍यात आले आहेत. आता कोरोनाची चाचणी अवघ्या 1200 रुपयांमध्ये होणार आहे, असे टोपे यांनी म्हटले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.