Covid News : जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी घेतली कोविड टास्क फोर्सची बैठक

एमपीसी न्यूज : परदेशात वाढणारी कोविड-19 रुग्णांची (Covid News) संख्या लक्षात घेता या साथरोगाला प्रतिबंध करण्यासाठी तसेच यातून निर्माण होऊ शकणाऱ्या कोणत्याही परिस्थितीला यशस्वीपणे तोंड देण्यासाठी जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा सज्ज करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिले.

कोविड-19 बाबत जिल्हाधिकारी पुणे यांच्या अध्यक्षतेखालील जिल्हास्तरीय कोविड टास्कफोर्स समितीची बैठक दूरदृश्यप्रणालीद्वारे घेण्यात आली. यावेळी पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉ. अंकित गोयल, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नागनाथ यमपल्ले, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भगवान पवार आदी उपस्थित होते.

सद्यस्थितीत चीन, अमेरिका, ब्राझील, इंडोनेशिया आदी देशांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. राज्यात व पुणे जिल्ह्यातही खबरदारी म्हणून प्रतिबंधक उपाययोजनांना गती देण्यासाठी आणि यंत्रणांच्या पूर्वतयारीचा आढावा घेण्यासाठी या बैठकीचे आयोजन करण्यात आले.

जिल्हाधिकारी डॉ. देशमुख म्हणाले, केंद्र शासनाच्या निर्देशाप्रमाणे जिल्ह्यातील प्रशासकीय आणि आरोग्य यंत्रणा सज्ज करण्यात यावी. ऑक्सिजन प्रकल्प, लिक्विड ऑक्सिजन स्टोरेज टँक, मेडिकल ऑक्सिजन पाईपलाईन आदी आवश्यक साहित्य सामुग्रीच्या प्रात्यक्षिकात त्रूटी आढळल्या असल्यास त्या तातडीने दूर करण्यात याव्यात. कोविड-19 च्या संभाव्य स्थितीचा नियोजनबद्धरित्या सामना करण्यासाठी यंत्रणा सज्ज ठेवावी. जास्तीतजास्त पात्र नागरिकांचे कोविड प्रतिबंधक लसीकरण करण्यासाठी लसीकरण बुथची संख्या वाढविण्याचे निर्देशही जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांनी बैठकीत दिले.

डॉ. पवार यांनी यावेळी माहिती दिली, सद्यस्थितीत पुणे जिल्ह्यात कोविडचे 50 रुग्ण  (Covid News) असून दैनंदिन सरासरी 11 रुग्ण बरे होत आहेत. कोविड प्रतिबंधक लसीकरणाला गती देण्यात येत असून आतापर्यंत जिल्ह्यात एकूण 1 कोटी 93 लाख 45  हजार 470 कोविड प्रतिबंधक लसीकरण करण्यात आले आहे. त्यामध्ये 99 लाख 5 हजार 418 पहिली मात्रा, 84 लाख 59 हजार 834 दुसरी मात्रा तर 9 लाख 80 हजार 218 वर्धक मात्रा देण्यात आल्या आहेत. जिल्ह्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र स्तरावर सर्व लाभार्थीसाठी कोविड लसीकरणाची सोय केलेली आहे, असेही ते म्हणाले.

Pimpri : पक्क्या अनुज्ञप्तीसाठी मासिक दौऱ्याचे आयोजन

कोविड उपाययोजनांतर्गत जिल्ह्यात 114 पीएसए ऑक्सिजन प्रकल्प तर 109 लिक्विड ऑक्सिजन स्टोरेज टँक उपलब्ध असून या दोन्हींची मिळून एकूण क्षमता 1 हजार 210 मेट्रीक टन आहे. जिल्ह्यामध्ये सुस्थितीतील 1 हजार 196 व्हेंटीलेटर्स तसेच 1 हजार 97 ऑक्सिजन कॉन्सन्स्ट्रेटर्स उपलब्ध आहेत. जिल्ह्यात एकूण 5 हजार 401 विलगीकरण बेड, 5 हजार 964 ऑक्सिजन बेड, 1 हजार 293 आयसीयु बेड उपलब्ध करण्यात आलेले आहेत.

केंद्र शासनाच्या सुचनेनुसार घेण्यात आलेल्या प्रात्यक्षिकामध्ये डेडिकेटेड कोविड हॉस्पिटल, डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर तसेच खासगी रुग्णालये आदी सर्व रुग्णालयांची मनुष्यबळ, यंत्रसामग्री, औषधेपचार, रुग्णवाहिका, संदर्भसेवा व टेलिकन्सल्टेशन आदीबाबत आढावा घेण्यात आला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.