Pimpri News: कोरोना रुग्णसंख्येचा पॉझिटिव्हिटी रेट दोनच्या खाली!

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरातील कोरोना रुग्णांची संख्या कमी होत आहे. परिणामी, पॉझिटिव्हिटी रेट आणि मृत्यू दर कमी झाला आहे. शहरातील पॉझिटीव्ही रेट दोन टक्क्यांच्या खाली आला आहे. ऑक्टोबरच्या शेवटच्या दिवशी शहराचा पॉझिटिव्हिटी रेट 1.74 टक्के होता. कोरोनाचे संकट सुरू झाल्यापासूनचा हा सर्वांत कमी पॉझिटिव्हिटी रेट आहे. तर, कोरोनाचे संकट सुरू झाल्यापासूनचा सर्वाधिक पॉझिटिव्हिटी रेट हा एप्रिल महिन्यात होता. एप्रिलमध्ये शहराचा पॉझिटिव्हिटी रेट 27.32 होता. हा आतापर्यंतचा सर्वाधिक पॉझिटिव्हिटी रेट आहे.

पिंपरी-चिंचवड शहरात 10 मार्च 2020 पासून कोरोनाचे संकट सुरू झाले होते. त्यावेळी मार्च आणि एप्रिल महिन्यात 4.10 टक्के पॉझिटिव्हिटी रेट होता. त्यानंतर शहरात कोरोना रुग्णांची संख्या दिवसगणिक वाढत राहिली. मागील वर्षी मे महिन्यात 11.96 टक्के पॉझिटिव्हिटी रेट होता.

त्यानंतर जूनमध्ये पॉझिटिव्हिटी रेटमध्ये दुपट्टीने वाढ झाली. पॉझिटिव्हिटी रेट 20.97 टक्क्यांवर गेला. ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये शहरात मोठ्या प्रमाणावर कोरोनाचा उद्रेक वाढला. याकाळात ऑगस्टमध्ये 25.29 टक्के, तर, सप्टेंबरमध्ये 25.20 टक्के पॉझिटिव्हिटी रेट होता.

सप्टेंबरनंतर शहरातील कोरोना रुग्णांची संख्या कमी झाली. त्यानंतर ऑक्टोबरमध्ये 11.80 टक्के पॉझिटिव्हिटी रेट होता. त्यानंतर नोव्हेंबरमध्ये तो खाली येत 6.68 टक्के एवढा होता. डिसेंबरमध्ये 5.76 टक्क्यांपर्यंत पॉझिटिव्हिटी रेट कमी झाला होता. चालू वर्षाच्या सुरुवातीला शहरातून कोरोना संपला, अशी स्थिती निर्माण झाली होती.

रुग्णसंख्या 100 च्या आतमध्ये आली होती. परंतु, फेब्रुवारीनंतर शहरात कोरोनाची दुसरी लाट सुरू झाली. ही लाट तीव्र होती. मे महिन्यापर्यंत शहरात कोरोना रुग्णांची संख्या वाढत राहिली. त्यानंतर जूनपासून पुन्हा रुग्ण संख्या कमी होण्यास सुरुवात झाली.

ऑगस्टपासून रुग्णसंख्या स्थिर झाली आहे. रुग्णसंख्या 100 च्या आतमध्ये आली आहे. रुग्णसंख्येत घट होत आहे. रुग्णसंख्या घटल्याने पॉझिटीव्ही रेटही खाली आला आहे. पॉझिटीव्ही रेट दोन टक्क्यांच्या खाली आला आहे. ऑक्टोबरच्या शेवटच्या दिवशी शहराचा पॉझिटिव्हिटी रेट 1.74 टक्के होता. त्यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे.

”दिवाळी खरेदीसाठी नागरिकांची बाजारपेठेत मोठी गर्दी होत आहे. नागरिकांनी नियमांचे काटेकोरपणे पालन करावे. मास्क घालावा. सुरक्षित अंतर पाळावे. कोरोनाची तिसरी लाट येणार नाही याची दक्षता घ्यावी. कोरोनाची तिसरी लाट आल्यास महापालिका यंत्रणा सज्ज आहे. शहरातील 23 लाख नागरिकांचे लसीकरण झाले आहे. ज्यांचा पहिला डोस राहिला आहे. त्यांनी तातडीने लसीकरण करुन घ्यावे. ज्यांचा दुसरा डोस राहिला आहे. त्यांनीही दुसरा डोस घ्यावा” असे आवाहन वैद्यकीय विभागप्रमुख डॉ. लक्ष्मण गोफणे यांनी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.