Chinchwad News : सुमित ग्रुप ऑफ कंपनीतर्फे कामगारांसाठी कोविड लसीकरण मोहीम

पहिल्या टप्प्यात 250 कामगारांचे लसीकरण

एमपीसी न्यूज –  सुमित ग्रुप ऑफ कंपनीज यांच्या पुढाकाराने कंपनीतील कामगार, कर्मचाऱ्यांना कामाच्या ठिकाणीच कोविड लसीकरण करण्यासाठी मोहीम राबवण्यात आली.  आतापर्यंत सुमित ग्रुप ऑफ कंपनीमधील अडीचशेहून अधिक कामगारांचे यातंर्गत लसीकरण करण्यात आले आहे.

पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये सध्या कोरोना संसर्ग बधितांची मोठी संख्या रोजच समोर येत आहे .
पिंपरी-चिंचवड ही उद्योग नगरी आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवड लगतच्या भागातून येथील कंपन्यांमध्ये हजारो कामगार दर दिवशी येत असतात. त्यामुळे या कामगारांना सुरक्षित ठेवण्यासाठी कंपन्यांनीच आता कामगारांच्या लसीकरणासाठी पुढाकार घेतला आहे.

याच पार्श्वभूमीवर सुमित ग्रुपने  आपल्या कंपनीमध्ये लसीकरण मोहीम राबवली. यामध्ये पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे सहकार्य घेण्यात आले. कंपनीतील कामगारांच्या लसीकरण मोहिमेचे उद्घाटन कंपनीचे चेअरमन डॉ. प्रभाकर साळुंखे यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप, वैद्यकीय अधिकारी डॉ. शैलजा भावसार, डॉ. किरण बोऱ्हाडे, कंपनीचे डायरेक्टर अमित साळुंखे, सुमित ग्रुप ऑफ फॅसिलिटीचे सुमित साळुंखे, फायनान्स डायरेक्टर अजित दरंदळे,  बिझनेस डेव्हलपमेंट मॅनेजर सुमित मोरे, कामगार नेते बाबा कांबळे आदी उपस्थित होते.

सुमित ग्रुप ऑफ कंपनीच्या पुणे आणि पिंपरी-चिंचवड विभागात सुमारे दहा हजार कामगार काम करीत आहेत. या कामगारांसाठी एक आठवडाभर लसीकरण मोहीम राबविण्यात येणार आहे. केंद्राने दिलेल्या अटीनुसार सध्या 45 वर्षाच्या पुढील  कामगारांना ही लस दिली जात आहे. तर कंपनीच्या संपूर्ण भारतभर असलेल्या विविध विभागांमध्ये 45 हजार कामगार काम करत असून त्यांच्यासाठी ही टप्प्याटप्प्याने लसीकरण मोहीम राबविण्यात येणार आहे.

कामगारांना फ्रन्टलाइन वर्कर समजा- डॉ. साळुंखे

सध्या केंद्राने 45 वर्ष व यापुढील व्यक्तींना लस देण्याची मान्यता दिली आहे . मात्र यामुळे मोठी अडचण निर्माण होत आहे. अनेक हॉस्पिटल किंवा आरोग्य सेवा, क्षेत्राला खाजगी कंपन्यांमार्फत कामगार पुरवले जातात. मात्र या कामगारांना ही फ्रन्टलाइन वर्कर समजले जात नाही.

हेच उद्योगातील कामगारांच्या बाबतीतही आहे. अनेक कामगार हे 45 वयाच्या आतील आहेत. त्यामुळे त्यांना लस दिली जात नाही. ही अडचण केंद्राने विचारात घेऊन उद्योगांमध्ये काम करणाऱ्या कामगारांना फ्रन्टलाइन वर्कर समजावे अशी मागणी सुमित ग्रुप ऑफ कंपनीचे चेअरमन डॉ. प्रभाकर साळुंखे यांनी केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.