Covishield Vaccine : ऑक्सफर्डची ‘कोव्हीशिल्ड’ लस 70.4 टक्के परिणामकारक

एमपीसी न्यूज – ऑक्सफर्ड विद्यापीठाची ‘कोव्हीशिल्ड’ ही लस 70.4 टक्के परिणामकारक असल्याचं संशोधकांनी सांगितलं आहे. कोरोना लशीच्या चाचणीत 20 हजार स्वयंसेवक सहभागी झाले होते. ज्या स्वयंसेवकांना लशीचे दोन डोस देण्यात आले होते. त्यापैकी 30 जणांमध्ये कोरोनाची लक्षणं पहायला मिळाली, तर ज्यांना डमी इंजेक्शन दिले होते. त्यापैकी 101 जणांना कोरोनाचा संसर्ग झाला. ही लस 70.4 टक्के सुरक्षित असल्याचा दावा संशोधकांनी केला आहे.

‘कोव्हीशिल्ड’ या लशीचे दोन ‘हाय डोस’ जेव्हा स्वयंसेवकांना देण्यात आले, तेव्हा कोरोनापासून संरक्षण मिळण्याचं प्रमाण 62 टक्के होतं. ज्यांना या लशीचा एक लो डोस आणि नंतर एक हाय डोस देण्यात आला, तेव्हा मात्र कोरोनापासून संरक्षणाचं प्रमाण हे 90 टक्के एवढं झालं आहे.

फायजर आणि मॉडर्नाची लस 95 टक्के परिणामकारक असल्याचे सांगण्यात आल्यानंतर हे निकाल थोडेसे निराशजनक असल्याचं म्हटलं जात आहे पण ऑक्सफर्डची लस स्वस्त आहे आणि जास्त काळ साठवून ठेवता येते असं संशोधकांनी सांगितलं आहे. जर ही लस प्रमाणित करण्यात आली तर कोरोनावर विजय जिंकण्याच्या दृष्टीने महत्त्वाचं पाऊल ठरणार आहे.

दरम्यान, सिरमचे आदर पुनावाला यांनी याबाबत प्रतिक्रिया देताना किफायतशीर असणारी ही लस लवकरात लवकर उपलब्ध होईल, असे सुतोवाच केले आहे. लशीची 70.4 टक्के परिणामकारकता हि चांगली बाब असल्याचे त्यांनी म्हंटले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.