Covovax News: सिरमची दुसरी लस कोव्होव्हॅक्स जूनमध्ये येणार; ट्विटद्वारे अदर पूनावाला यांची महिती

एमपीसी न्यूज : सिरमने उत्पादित केलेली ‘कोव्होव्हॅक्स’ ही कोरोनावरील दुसरी लस जून महिन्यात बाजारात येईल, असा विश्वास सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अदर पूनावाला यांनी व्यक्त केला आहे. पूनावाला यांनी ट्विट करत ही माहिती दिली.

नुकत्याच ब्रिटनमध्ये पार पडलेल्या मानवी चाचण्यांमध्ये ही लस 89.3टक्के परिणामकारक असल्याचे सिद्ध झाले आहे.

अमेरिकेच्या नोव्हाव्हॅक्स कंपनीने विकसित केलेल्या या लशीच्या भारतातील चाचण्यांसाठी सिरम इन्स्टिट्यूटने या आधीच परवानगीही मागितली आहे.

त्या पार्श्वभूमीवर पूनावाला ट्वीटमध्ये म्हणतात, आमची सहयोगी कंपनी असलेल्या नोव्हाव्हॅक्सने विकसित केलेल्या कोरोना लशीची परिणामकारकता चांगली असल्याचे चाचण्यांमधून सिद्ध झाले आहे. आम्ही भारतातही चाचण्यांसाठी अर्ज केला असून, आम्हाला आशा आहे की जून 2021 ला आम्ही कोव्होव्हॅक्स बाजारात उपलब्ध होईल.

ब्रिटनमधील कोरोनाच्या नव्या स्ट्रेनवरही ही लस प्रभावी असल्याचे विविध संशोधनातून स्पष्ट झाले आहे. मात्र दक्षिण आफ्रिकेतील स्ट्रेन संदर्भात अधिकृत आकडेवारी येणे बाकी आहे. एप्रिलपर्यत सिरम कोव्होव्हॅक्सचे उत्पादन महिन्याला चार ते पाच कोटी मात्रांपर्यंत नेण्याची शक्यता आहे.

भारतामध्ये आजपर्यंत ऑक्सफर्ड ॲस्ट्राझेनिकाच्या कोव्हिशिल्ड लसीला जिचे उत्पादन सिरम इन्स्टिट्यूट करते आणि भारत बायोटेकच्या स्वदेशी कोव्हॅक्सिनला परवानगी देण्यात आली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.