Cricket and America : क्रिकेट आणि अमेरिका

एमपीसी न्यूज :  युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका – जगातील (Cricket and America) एक बलाढ्य देश. अमेरिकेला एक मोठा इतिहास आहे. कला, क्रीडा, संस्कृती या सर्वच बाबतीत अमेरिका कायमच स्वतःचे एक वेगळे स्थान टिकवून आहे. अमेरिकेची क्रीडा संस्कृती हा एक चांगल्या चर्चेचा विषय होऊ शकतो; ऑलिम्पिक खेळांमध्ये कायमच अमेरिका आघाडीवर असते. ऍथलेटिक्स, जलतरण, टेनिस आदी खेळांमध्ये कायमच अमेरिकन खेळाडू जागतिक पातळीवर चमकत आले आहेत. पण एवढ्या मोठ्या देशामध्ये क्रिकेटचे स्थान काय आहे असा प्रश्न आपल्याला कायमच पडत आला आहे.

एक प्रवाद असाही आहे की अमेरिकेला क्रिकेटमध्ये काहीही इंटरेस्ट नाही. त्यांचा आणि क्रिकेटचा काहीही संबंध नाही. अमेरिका आणि बेसबॉल हे नातं जास्त घट्ट असल्याने तिथे क्रिकेटचं वातावरण तयार होऊच शकत नाही. हे काही अंशी खरं असलं तरी संपूर्ण सत्य नक्कीच नाही. अमेरिकेत चांगल्या दर्जाचं क्रिकेट खेळलं जातं, अमेरिकेचा क्रिकेटचा राष्ट्रीय संघ आहे, आणि आयसीसीच्या अनेक स्पर्धांमध्ये अमेरिका भाग घेत असते. एकदिवसीय आणि टी 20 क्रिकेट अश्या दोन्ही प्रकारात अमेरिकेचा राष्ट्रीय संघ भाग घेत असतो. एवढेच नाही, तर 2004 मध्ये इंग्लंडमध्ये झालेल्या चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत अमेरिकेचा संघ सहभागी झाला होता. त्या स्पर्धेत त्यांनी ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड ह्या देशांविरुद्ध सामने खेळले. (ह्या दोन्ही सामन्यात त्यांचा दारुण पराभव झाला हे सांगायला नको.)

2004 नंतर देखील अमेरिका अनेकदा जागतिक पातळीवर क्रिकेट (Cricket and America) खेळताना दिसते. बहुतांशवेळा त्यांचे सामने आयसीसी वर्ल्ड क्रिकेट लीग स्पर्धेत होतात. अश्या देशांना आयसीसीने असोसिएटेड देश म्हणून खेळायची परवानगी दिली आहे. ह्या देशांमध्ये नेपाळ, सिंगापूर, नामिबिया, ओमान, पापुआ न्यू गिनी सारख्या संघांचा समावेश होतो. प्रसंगी अमेरिकेचा क्रिकेट संघ यु ए ई, आयर्लंड, स्कॉटलंड, अफगाणिस्तान सारख्या देशांविरुद्ध  देखील खेळला आहे. हा अमेरिकेचा क्रिकेट मधील गेल्या काही वर्षांचा इतिहास आहे. पण एकूणच अमेरिकेतील क्रिकेटचा विचार करायचा झाला तर त्याची सुरुवात साधारण 1830-40 पासून झाली असं नक्की म्हणता येईल. अमेरिकेत त्याच सुमारास युरोपीय लोक, प्रामुख्याने ब्रिटिश आले आणि येताना ते क्रिकेट देखील घेऊन आले. 1890-40 च्या सुमारास अमेरिका आणि कॅनडा ह्या दोन्ही देशांमध्ये (प्रामुख्याने दोन्ही देशांच्या पूर्व भागात) क्रिकेट खेळायला सुरुवात झाली होती. न्यूयॉर्क, बोस्टन, फिलाडेल्फिया, टोरांटो आदी शहरांमध्ये क्रिकेट क्लब्सची स्थापना झाली होती, आणि त्या क्लब्समध्ये सामने होत असत. दोन देशांमधील पहिला कसोटी सामना 1877 साली झाला. ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड ह्या दोन देशांमध्ये पहिला सामना झाला असे आपण मानतो. परंतु त्याआधी काही वर्षांपूर्वी, साधारण 1844-45 मध्ये न्यूयॉर्क मध्ये अमेरिका आणि कॅनडा ह्या दोन देशांमध्ये क्रिकेट सामना खेळवला गेला. वर उल्लेख केलेल्या शहरांमधून काही खेळाडूंची निवड करून हा सामना खेळला गेला. 24 सप्टेंबर 1844 रोजी ह्या सामन्याची सुरुवात झाली, दुसरा दिवस पावसाने वाया गेला आणि तिसऱ्या दिवशी म्हणजे 26 सप्टेंबर रोजी सामन्याचा दुसरा दिवस खेळवला गेला. ह्या सामन्याची चांगली जाहिरात देखील केली गेली, त्यामुळे सामन्याला साधारण 15-20 हजार प्रेक्षकांची उपस्थिती तर होतीच, परंतु सामन्यावर एक लाख अमेरिकन डॉलर्सचा सट्टा देखील लावला गेला होता. हा सामना कॅनडा संघाने 23 धावांनी जिंकला. त्यानंतर लगेचच पुढच्या वर्षी, म्हणजे1845 मध्ये कॅनडामध्ये ह्या दोन संघांमध्ये क्रिकेटचा सामना खेळवला गेला. इथेच ह्या दोन संघांमधील क्रिकेट ट्रॉफी – ऑटी कप ची सुरुवात झाली. ऑटी कप ही क्रिकेट स्पर्धा अमेरिका आणि कॅनडा ह्या दोन देशांमध्ये अनेक वर्षे भरवली जात असे.
गेल्या काही वर्षांमधील अमेरिकेतील क्रिकेट प्रामुख्याने टी 20 भोवती केंद्रित आहे. अमेरिकेतील मोठमोठ्या शहरांमध्ये क्रिकेट क्लब्स आहेत, ज्यामध्ये भारतीय उपखंडातून आलेल्या अनेक क्रिकेट खेळाडूंचा समावेश आहे. त्याचबरोबर वेस्ट इंडिज बेटांवरून आलेले अनेक खेळाडू अमेरिकेतील लीग्स मध्ये खेळताना दिसतात. आता अमेरिकेतील वेगवेगळ्या लीग्स मध्ये अनेक भारतीय वंशाचे खेळाडू खेळताना दिसतात. उदाहरणच द्यायचे झाले तर महाराष्ट्राकडून खेळलेला सुशील नाडकर्णी  हा अमेरिकेचा 2010 च्या सुमारासचा प्रमुख खेळाडू म्हणता येईल. सुशीलने अमेरिकेच्या राष्ट्रीय संघाचे नेतृत्व देखील केले आहे. सौरभ नेत्रावळकर हा असाच एक गुणी खेळाडू. सौरभ मुंबई संघाकडून रणजी ट्रॉफी खेळला आहे. पण पुढे तो अमेरिकेला स्थायिक झाला. आणि अगदी आत्तापर्यंत तो अमेरिकेच्या संघाचे नेतृत्व करत होता. सुशील आणि सौरभ ह्या दोघांनीही 19 वर्षांखालील भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. गेल्या 1-2 वर्षातच उन्मुक्त चंद, स्मित पटेल सारख्या गुणी भारतीय खेळाडूंनी अमेरिकेचा रस्ता पकडला आहे. येत्या काही दिवसात ते अमेरिकेकडून क्रिकेट खेळताना दिसतीलही. जस्करण मल्होत्रा हा असाच एक  गुणी खेळाडू. भारतीय संघात वर्णी लागणे अवघड असल्याने त्याने अमेरिकेची वाट धरली. मागच्या वर्षी अमेरिकेकडून (Cricket and America) एकदिवसीय सामना खेळताना त्याने एका षटकात सहा षटकार मारण्याचा विक्रम केला आहे. एकदिवसीय सामन्यात असा विक्रम करणारा तो केवळ दुसरा खेळाडू आहे. (दक्षिण आफ्रिकेचा हर्स्चेल गिब्स पहिला खेळाडू.)

अमेरिकेत फ्लोरिडा राज्यातील फोर्ट लोडरहील ह्या शहरात आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रिकेट ग्राउंड आहे. 2010 पासून ह्या मैदानावर आंतरराष्ट्रीय सामने खेळवले जातात. अमेरिकेबरोबरच वेस्ट इंडिज, भारत, न्यूझीलंड, श्रीलंका, बांगलादेश इत्यादी देश ह्या मैदानावर क्रिकेट खेळले आहेत. त्याच बरोबर अमेरिकेत ‘प्रो क्रिकेट लीग’, ‘मायनर क्रिकेट लीग’ अश्या वेगवेगळ्या क्रिकेट लीग्स देखील भरवल्या जातात.
अमेरिकन क्रिकेट असोसिएशन (USACA) लवकरच आयपीएलच्या धर्तीवर एक मोठी क्रिकेट लीग सुरु करण्याच्या तयारीत आहे. गोष्टी नीट जुळून आल्या तर कदाचित येत्या काही वर्षात अमेरिकेतील ही मोठी लीग क्रिकेट विश्वात धमाका करेल हे निश्चित. क्रिकेटचा समावेश ऑलिम्पिक मध्ये व्हावा अशी इच्छा अनेक क्रिकेट रसिकांची आहे. आयसीसी देखील त्या दृष्टीने आता पावले उचलत आहे. अमेरिकेत चांगले क्रिकेट खेळले जाणे, आणि अमेरिकेतील क्रिकेटला चालना मिळणे हे त्या दृष्टीने महत्वाचे असेल. बेसबॉल, बास्केटबॉल वेड्या अमेरिकेत क्रिकेटचे वारे अधूनमधून थोडे का होईना पण वाहत असतात. अमेरिकेत क्रिकेटचा प्रसार झाला आणि ह्या खेळणे चांगले बाळसे धरले तर क्रिकेटची प्रगती निश्चित आहे.
सध्या सुरु असलेल्या वेस्ट इंडिज विरुद्ध भारत ह्या संघांमधील दोन टी 20 सामने अमेरिकेत खेळवले जाणार आहेत. त्या निमित्ताने अमेरिकेतील क्रिकेटबद्दल थोडेसे.
– कौस्तुभ चाटे 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.