Amritsar: युवराजला ‘ड्रॉप’ करण्यासाठी कोहली धोनीची मदत करत होता – योगराज सिंग

एमपीसी न्यूज –  योगराज सिंग यांनी यापूर्वी धोनीवर जोरदार टीका केली होती. पण योगराज यांनी आता धोनीबरोबर कोहलीवरही टीका केली आहे. युवराजला ड्रॉप करण्यासाठी कोहली धोनीची मदत करत होता असा गंभीर आरोप युवराजचे वडिल आणि भारताचे माजी क्रिकेटपटू योगराज सिंगने केला आहे.

योगराज सिंग म्हणाले, कोहली आणि धोनीबरोबर निवड समितीने सुद्धा युवराजचा विश्वासघात केला आहे. प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी मला एका फोटोसाठी बोलावले होते. त्यावेळी मी त्यांना माझ्याजवळ बोलावून  सांगितले की, मी निवड समितीला धोनी, कोहली आणि रोहित शर्मा यांना निवृत्ती घेण्यासाठी एक सामना द्यावा असे सांगणार आहे. कारण या तिघांनी बऱ्याच खेळाडूंच्या पाठीत खंजीर खुपसला आहे.

काही दिवसांपूर्वी युवराज सिंग सोशल नेटवर्किंग साइटवर बोलताना म्हणाला होता, मला एक खेळाडू म्हणून जेवढा पाठिंबा सौरव गांगुलीने दिला तेवढा धोनी आणि कोहली यांनी कधीच दिला नाही. त्यानंतर आता योगराज सिंग यांनी धोनी आणि कोहली यांच्यावर निशाणा साधला आहे. कोहली आणि धोनीने कधीच युवराजला पाठिंबा दिला नाही, असे त्यांनी सांगितले आहे.

युवराज सिंगच्या निवृत्ती नंतर योगराज सिंग जास्त आक्रामक झाले होते आणि तेव्हापासून धोनी आणि निवड समितीवर नेहमी वेगवेगळे आरोप करत आलेत, एवढेच नव्हे तर 2019 च्या विश्वचषकानंतर वेळ आल्यावर मी सगळ्या गोष्टी सांगेन असेही ते म्हणाले होते. 2011च्या विश्वचषकाच्या निवडीसाठी धोनी हा युवराजपेक्षा सुरेश रैनाला जास्त प्राधान्य देत होता. पण त्याने युवराजला पाठिंबा दिला नव्हता असा त्यांनी धोनीवर आरोप केला होता.

ज्यांना क्रिकेटची एबीसीडी माहिती नाही, त्यांना निवड समिती सदस्य बनवण्यात आले आहे असे म्हणत योगराज सिंग यांनी निवड समिती सदस्य शरणदीप सिंग यांच्यावरही टीका केली आहे. योगराज सिंग नेहमीच त्यांच्या आक्रामक विधानं आणि खेळाडूंवर आरोप करत आलेत त्यामुळे आता या सगळ्या प्रकरणाला नेमकी काय दिशा मिळणार यावर क्रिडा रसिकांचे लक्ष लागून आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.