Article by Vivek Kulkarni : ‘टीम इंडियाचा विजयी झंझावात लॉर्ड्सवर सुद्धा कायम राहो’

एमपीसी न्यूज (विवेक कुलकर्णी) : अपेक्षेप्रमाणे भारतीय संघाने इंग्लिश संघाचा चौथ्या आणि अंतिम सामन्यात तिसऱ्याच दिवशी एक डाव आणि 25 धावांनी पराभूत करत जागतिक कसोटी मालिकेच्या अंतिम फेरीत दिमाखात प्रवेश केला. कोहलीने कर्णधार म्हणून मायदेशात तब्बल दहावी कसोटी मालिका जिंकण्याचा भीमपराक्रम करत रिकी पॉंटिंगच्या विक्रमाशी बरोबरी केली.

खरेतर पहिला सामना अत्यंत वाईट पध्दतीने चेन्नईत हारल्यानंतर आणि इंग्लंड संघाची मागील काही सामन्यातली जोरदार कामगिरी बघता भारतीय संघ आता ही मालिका नक्कीच हारणार, असे भाकीत काही क्रिकेट पंडितांनी व्यक्तही केले होते, पण कोहलीची ही विराट टीम जबरदस्त आत्मविश्वास असलेली आहे. तसेच कधीही हार न मानणारी विजिगीशू वृत्तीची आहे, याचा प्रत्यय दुसऱ्याच सामन्यात आला. मग पुढे यावर केवळ आणि केवळ शिक्कामोर्तबच होत गेले.

तिसऱ्या ऐतिहासिक दिवसरात्रीच्या सामन्यात अक्षर पटेलने शब्दशः कहर केला आणि अवघ्या पाऊणे दोन दिवसांतच इंग्लंड संघ दोनदा गारद झाला. त्यानंतर याच जगातल्या सर्वात मोठ्या मैदानावर पुन्हा चौथ्या आणि अंतिम सामन्यात पुन्हा तिसऱ्याच दिवशी इंग्लंड संघ अवघ्या सव्वाशे धावात गार झाला नी भारतीय संघाने एक डाव आणि 25 धावांनी मालिकेत विक्रमी आघाडी मिळवली. शिवाय जागतिक कसोटी मालिकेच्या अंतिम फेरीचे तिकीट सुद्धा नक्की केले.

काल नाबाद असणारा सुंदर आणि नवखा अक्षर पटेल याने आज जवळपास लंच पर्यंत खेळत आपल्याला 160 रन्सची आघाडी मिळवून दिली आणि खऱ्या अर्थाने विजयाची मुहूर्तमेढ रोवली. मात्र, सुंदरला शेवटी इशांत शर्मा आणि सिराजची साथ न मिळाल्याने त्याचे शतक मात्र झाले नाही. पण, म्हणून त्या खेळीचे महत्व कमी होत नाही. केवळ दुर्दैवाने त्याचे शतक झाले नाही. मात्र, त्याने भारताला जबरदस्त आघाडी मिळवून द्यायचे काम आणि इंग्लिश संघाला मानसिकरित्या खच्ची करण्याचे मोठे काम केले.

दुसऱ्या डावात अपेक्षितरित्या इंग्लिश फलंदाजी कोसळली आणि तिसऱ्याच दिवशी भारतीय संघाने सामना आणि मालिका जिंकून अनेक विक्रमांना गवसणी घातली.

आर. अश्विन तब्बल आठव्यांदा मालीकावीर झाला लक्षात घ्या ही कामगिरी ग्रेट सचिन वा विराट कोहली सुद्धा करू शकले नव्हते. याआधी अनिल कुंबळे याने सर्वात जास्त म्हणजेच पाच वेळा ही कामगिरी केली होती. अश्विनने सर्वाना मागे टाकले आहे.

_MPC_DIR_MPU_II

आता अक्षर पटेलने जडेजाच्या अनुपस्थितीत मिळालेल्या संधीचे जबरदस्तरित्या सोने करून पदार्पणातच 27 विकेट्स मिळवत दिलीप दोषीचा वर्षानुवर्षे अबाधित असलेल्या विक्रमाच्या बरोबरी केली.

रिषभ पंतने जवळपास पाचशेच्या आसपास धावा केल्याचं पण आपल्या हुकत चाललेल्या शतकाला सुद्धा गवसणी घालत आपले भविष्य किती आणि का सोनेरी आहे, या चर्चेला पूर्णपणे न्याय दिला.

रोहित शर्माने सुद्धा उत्तम फलंदाजी केली मात्र राहणे, पुजारा, कोहली यांना आपल्या क्षमतेला न्याय देता आला नाही. अर्थात क्रिकेटमध्ये असा क्षण प्रत्येकाच्या आयुष्यात येतोच.

एकंदरीतच कोणी एक हिरो नसताना सुद्धा अनेक जणांच्या कामगिरीने भारतीय संघाला आजचे यश मिळालेले आहे याबद्दल सर्व संघाचे आणि त्यांच्या सपोर्ट स्टाफचे मनःपूर्वक अभिनंदन.

हीच कामगिरी आता लॉर्ड्सवर सुद्धा कायम राहो आणि कसोटीचा वर्ल्डकप भारतीय संघ जिंकून एक इतिहास रचो इतकीच अपेक्षा जी माझी आहे तीच तुमचीही असणार याबद्दल मला का बरे शंका असेल ?

लेखक – विवेक कुलकर्णी

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.