Cricket Update: भारतात विश्वचषक खेळण्यासाठी PCBला हवंय लेखी आश्वासन, BCCIने म्हटलं…

Cricket Update: PCB needs written assurance to play World Cup in India, BCCI says या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी पाकिस्तानी संघाला कोणत्याही समस्येला सामोरं जावं लागणार नाही, यासाठी आम्हाला लिखीत आश्वासन हवं आहे.

एमपीसी न्यूज- पाकिस्तान क्रिकेट बोर्डने 2021चा T20 विश्वचषक आणि 2023च्या वन-डे विश्वचषक स्पर्धेत सहभागी होता यावं यासाठी बीसीसाआयकडे लेखी आश्वासन मागितलं आहे.

पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे सीईओ वसिम खान यांनी याबाबत बोलताना असे म्हटले आहे की, 2021 आणि 2023 मध्ये होणाऱ्या विश्वचषक स्पर्धेचे यजमानपद भारताकडे आहे.

या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी पाकिस्तानी संघाला कोणत्याही समस्येला सामोरं जावं लागणार नाही, यासाठी आम्हाला लिखीत आश्वासन हवं आहे. बीसीसीआयने आम्हाला हमी द्यावी. तसेच अशी मागणी आम्ही आयसीसीकडेही करणार आहोत.

पाकिस्तानच्या या अजब मागणीला बीसीसीआयने सडेतोड प्रतिउत्तर दिले असून आयसीसीच्या नियमांची आठवण करून दिली आहे. आयएएनएस वृत्तसंस्थेशी बोलताना बीसीसीआय अधिकाऱ्यांनी भारताची बाजू स्पष्ट केली.

आयसीसीचा नियम स्पष्ट सांगतो, कोणताही सामना किंवा स्पर्धेत सरकारचा हस्तक्षेप असू नये, हीच गोष्ट क्रिकेट बोर्डांनाही लागू होते. सरकारने कसं काम करावं, काय निर्णय घ्यावेत हे क्रिकेट बोर्डाने सांगू नये.

पाकिस्तान सरकार यापुढे सीमेपलीकडून अवैध घुसखोरी, पाक सैन्याकडून होणारं शस्त्रसंधीचं उल्लंघन, अतिरेकी हल्ले बंद करण्यात येईल असं आश्वासन पाक क्रिकेट बोर्ड आम्हाला लेखी स्वरुपात देऊ शकतं का ? भारतात अतिरेकी हल्ले होणार नाही, पुलवामासारखा हल्ला पुन्हा होणार नाही असं आश्वासन पीसीबी देऊ शकतं का, अशा शब्दांत बीसीसीआय अधिकाऱ्यांनी आपली बाजू मांडली.

आयसीसीचे नियम स्पष्ट असताना पाक क्रिकेट बोर्डाने अशी मागणी करणं योग्य नाही. आयसीसीमध्ये नेहमी भारताविरोधी भूमिका घेणाऱ्यांचे एजंट म्हणून काम करणं पाक क्रिकेट बोर्डाने थांबवावे अशा शब्दांत बीसीसआयने पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचा खरपूस समाचार घेतला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
You might also like