WI Beat England: वेस्ट इंडिजचा इंग्लंडवर चार गडी राखून विजय

Cricket Updates: West Indies beat England by four wickets पहिला गडी बाद झाल्यानंतर वेस्ट इंडिजला अजून एक धक्का बसला होता. जॉन कॅम्पबेल एका धावेवर खेळत असताना रिटायर्ड होत तंबूत परतला.

एमपीसी न्यूज- लॉकडाऊननंतर सुरू झालेल्या क्रिकेटमधील पहिल्या कसोटी सामन्यात वेस्टइंडीजने इंग्लंडवर 4 गडी राखून विजय मिळवला आहे. कसोटी सामन्याच्या पाचव्या दिवशी 200 धावांचा पाठलाग करताना चौथ्या डावात जेरमाइन ब्लॅकवूडने दमदार 95 धावांची खेळी केली आणि संघाला पहिला विजय मिळवून दिला.

सामन्याच्या पाचव्या व शेवटच्या दिवशी 200 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना वेस्ट इंडिजने झटपट तीन गडी गमावले. क्रेग ब्रेथवेट, शाय होप आणि ब्रूक्स हे तिघे एकेरी धावसंख्येवर माघारी परतले.

पहिला गडी बाद झाल्यानंतर वेस्ट इंडिजला अजून एक धक्का बसला होता. जॉन कॅम्पबेल एका धावेवर खेळत असताना रिटायर्ड होत तंबूत परतला. त्याला खेळताना दुखापत झाली. त्यामुळे गरज पडली तरच तो फलंदाजीस उतरेल अशी माहिती विंडिज क्रिकेट बोर्डाने दिली.

त्यानंतर रॉस्टन चेस आणि जेरमाईन ब्लॅकवूड या दोघांनी दमदार खेळी केली. त्यांनी 73 धावांची भागीदारी करत पाहुण्या संघाच्या विजयाच्या आशा पल्लवित केल्या.

चेस 37 धावांवर बाद झाल्यावर ब्लॅकवूडने होल्डरच्या साथीने डाव पुढे नेला. ब्लॅकवूड 95 धावांवर बाद झाल्यावर होल्डरने विजयासाठी आवश्यक धावा काढून विजयाची नोंद केली.


तत्पूर्वी, इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता. त्यांनी पहिल्या डावात 204 धावा केल्या. तर प्रत्युत्तरात वेस्ट इंडिजचा पहिला डाव 318 धावांवर संपुष्टात आला. त्यामुळे वेस्ट इंडिजकडे पहिल्या डावाअखेरीस शतकी आघाडी होती.

त्यानंतर इंग्लडंच्या दुसऱ्या डावात सिबलीने (50) अर्धशतकी खेळी केली. डेन्टलीनेही 29 धावा केल्या. त्यानंतर क्राव्हलीने डाव सांभाळत स्टोक्सला साथ दिली. या दोघांनी 98 धावांची भागीदारी केली. हे दोघे एकापाठोपाठ बाद झाले.

क्राव्हलीने 76 तर स्टोक्सने 46 धावा केल्या. त्यानंतर जोफ्रा आर्चरने (23) काही काळ झुंज दिली, पण इतर फलंदाज झटपट बाद झाले. त्यामुळे इंग्लंडला 313 धावाच करता आल्या. गॅब्रियलने 5, होल्डर-चेसने प्रत्येकी 2 तर होल्डरने 1 बळी टिपला.

धावफलक:

इंग्लंड पहिला डाव- 204 धावा

वेस्ट इंडिज पहिला डाव- 318 धावा

इंग्लंड दुसरा डाव- 313 धावा

वेस्ट इंडिज दुसरा डाव- 200 धावा

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.