Hinjawadi : महामार्गावर आंदोलन करणा-या 300 जणांवर गुन्हा

एमपीसी न्यूज – मराठा मोर्चाच्या वतीने गुरुवारी (दि. 9) संपूर्ण महाराष्ट्र बंदचे आयोजन केले होते. त्यानिमित्त सर्व शहरांमध्ये ठिकठिकाणी मोर्चे काढून आंदोलन करण्यात येत होते. परंतु महामार्गावर बेकायदेशीरपणे आंदोलन करणा-या सुमारे 300 जणांवर हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस नाईक हनुमंत कुंभार यांनी याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात पोलिसांच्या वतीने फिर्याद दिली आहे. त्यानुसार कात्रज-देहूरोड बाह्यवळण मार्गावर बेकायदेशीरपणे आंदोलन करणा-या सुमारे 300 आंदोलकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने महाराष्ट्र बंदचे आवाहन करण्यात आले होते. त्यानुसार पिंपरी-चिंचवड आणि पुणे शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला. पथारी, टपरी चालकांपासून ते मोठ्या व्यावसायिकांपर्यंत सर्वांनी एक दिवसीय बंद पाळला. पुणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत जमावबंदीचे आदेश काढण्यात आले होते. कात्रज-देहूरोड बाह्यवळण मार्गावर राधा चौक ते छत्रपती शिवाजी स्टेडियम बालेवाडी दरम्यान नागरिकांनी बेकायदेशीरपणे आणि विनापरवाना जमाव जमवून मोर्चा काढल्याबद्दल त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.