Chakan : बनावट व्हिसा प्रकरणी ‘त्या’ नायजेरियन नागरिकावर गुन्हा

एमपीसी न्यूज – ड्रग्ज प्रकरणात पिंपरी-चिंचवड पोलिसांनी एका नायजेरियन नागरिकाला देखील अटक केली आहे. त्याने भारतातील वास्तव्यासाठी बनावट भारतीय व्हिसा जवळ बाळगला असल्याचे निष्पन्न झाल्याने त्याच्यावर याबाबत स्वतंत्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जुबी इफनेई उडोंको (वय 41, रा. बसंत विहार, नवीन इमारत नायगाव, ता. वसई, जि. पालघर) असे नायजेरियन आरोपीचे नाव आहे. पोलीस निरीक्षक बाळकृष्ण सावंत यांनी याबाबत चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चाकण – शिक्रापूर रोडवर पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने 20 किलो मेफेड्रोन ड्रग्ज पकडले. त्यात काही जणांना अटक करण्यात आली. त्यानंतर तपास करून आणखी आरोपींचा शोध घेत पिंपरी-चिंचवड पोलिसांनी ड्रग्ज प्रकरणाचा मोठा खुलासा केला. त्यात पोलिसांनी एका नायजेरियन नागरिकासह मुख्य सूत्रधाराला अटक केली.

अटक केलेल्या नायजेरियन नागरिकाने सुरुवातीला पोलिसांना सांगितलेले नाव आणि त्याच्या पासपोर्ट वरील नाव यामध्ये पोलिसांना तफावत आढळून आली. त्यामुळे पिंपरी-चिंचवड पोलिसांनी नायजेरियन अॅम्बेसिसोबत पत्रव्यवहार करून अटक केलेल्या नायजेरियन आरोपीबाबत माहिती मागवली.

त्यामध्ये अटक केलेला आरोपी हा नायजेरियाचा रहिवासी असून त्याने भारतातील वास्तव्यासाठी बनावट व्हिसा जवळ बाळगला असल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार त्याच्यावर भारतीय दंड विधान कलम 467, 68, 471, 420, सह परदेशी नागरिक कायदा 1946 कलम 14 (अ) (ब) पारपत्र अधिनियम 1950 चे कलम 3 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.