Hinjawadi : हिंजवडी परिसरातील गावठी दारू भट्टीवर गुन्हे शाखेचा छापा; एकाला अटक

एमपीसी न्यूज – हिंजवडी परिसरात बेकायदेशीर धंदे आणि दारूभट्ट्या सुरु असल्याचे समोर आले आहे. पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखा युनिट चारच्या पोलिसांनी माणगावात मुळा नदीच्या किनारी सुरु असलेल्या अवैध गावठी दारूभट्टीवर छापा मारला. या कारवाईमध्ये एक लाख 37 हजार 250 रुपयांचा दारूसाठा उध्वस्त करून एकाला अटक करण्यात आली आहे.

चंदू देव्या जाधव (वय 25, रा. चांदेगाव, ता. मुळशी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपरी-चिंचवड शहरात धूलिवंदन, रंगपंचमी या सणांच्या पार्श्वभूमीवर अवैध धंद्यांवर कारवाई करणे सुरु आहे. मुळशी तालुक्यातील माणगाव येथे मुळा नदीच्या किनारी चांदेगावच्या रस्त्यावर अवैधरित्या दारू भट्टी सुरु करण्यात आली आहे. त्यानुसार, पोलिसांनी परिसरात सापळा रचून भट्टीवर छापा मारला.

त्यावेळी आरोपी चंदू भट्टीवर दारू गाळण्याचे काम करत होता. त्याला पोलिसांनी ताब्यात घेऊन अटक केली. त्याच्यावर गुन्हा दाखल करत त्याला हिंजवडी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. पोलिसांनी अडीच हजार लिटर दारू बनविण्याचे कच्चे रसायन, 250 लिटर गावठी हातभट्टीची तयार दारू, बॅरल, पत्र्याच्या टाक्या व इतर साधने असा एकूण एक लाख 37 हजार 250 रुपयांचा ऐवज नष्ट केला.

ही कारवाई पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई, अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उपायुक्त सुधीर हिरेमठ, सहाय्यक पोलीस आयुक्त श्रीधर जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक मोहन शिंदे, सहाय्यक पोलीस निरीक्षक अंबरीश देशमुख, पोलीस कर्मचारी वासुदेव मुंडे, आदिनाथ मिसाळ, धर्मराज आवटे, संजय गवारे, दादाभाऊ पवार, नारायण जाधव, शावरसिद्ध पांढरे, लक्ष्मण आढारी, मोहंमद नदाफ, सुरेश जायभाये, सुनील गुट्टे, गोविंद चव्हाण, प्रशांत सैद, धनाजी शिंदे, तुषार काळे यांच्या पथकाने केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.