Nigdi : वारंवार रिक्षातून बाहेर थुंकणा-याला अडविल्यावरून चालकाला प्रवाशांकडून मारहाण

एमपीसी न्यूज – रिक्षातून जात असताना एक प्रवासी वारंवार बाहेर थुंकत असल्याने त्याचा त्रास अन्य प्रवाशांना होत होता. याबाबत संबंधित प्रवाशाला रोखले असता, त्या प्रवाशाने त्याच्या मित्रांच्या मदतीने रिक्षाचालकाला मारहाण केली. ही घटना शुक्रवार (दि. 2) रोजी खंडोबा माळ ते थरमॅक्स चौक दरम्यानच्या रस्त्यावर घडली. उपचारानंतर तक्रार दिल्याने सोमवारी (दि. 12) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

निलेश उर्फ प्रकाश अनिल गुजर (वय 36, रा. मोरया हाऊसिंग सोसायटी, शरदनगर, चिखली) यांनी याप्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार आठ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निलेश रिक्षा चालक आहेत. ते शुक्रवारी सायंकाळी सहाच्या सुमारास गरवारे कॉर्नर खंडोबा माळ ते थरमॅक्स चौक या दरम्यान चार प्रवाशांना घेऊन जात असताना एक प्रवासी वारंवार रिक्षातून थुंकत होता. त्याची थुंकी अन्य प्रवाशांच्या अंगावर पडत असल्याचे त्याचा त्रास अन्य प्रवाशांना होत होता. त्यामुळे निलेश यांनी त्याला थुंकण्यापासून रोखले. त्यावर त्याने निलेश यांना अरेरावी केली. तसेच त्याने त्याच्या अन्य साथीदारांना बोलावून रिक्षाला दगड आडवा लावून रिक्षा अडविली आणि निलेश यांना मारहाण केली. त्यातील एकाने लोखंडी कोयत्याने निलेश यांच्या डोक्यात, दंडावर आणि पायावर मारले. यामध्ये निलेश गंभीर जखमी झाले. त्यांना तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारानंतर निलेश यांनी तक्रार दिली. त्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक एस वाय होळकर तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.