Pune Crime News : डहाणूकर कॉलनीत वॉचमनचा मृतदेह आढळल्याने खळबळ

एमपीसी न्यूज – कोथरूडमधील डहाणूकर कॉलनी परिसरात अर्धवट बांधकाम झालेल्या बंगल्याची राखण करणाऱ्या वॉचमनचा खून झाल्याचा प्रकार उघडकीस आला.

दिलीप उर्फ रवींद्र रावण तावरे (वय 47, सध्या रा. डहाणूकर कॉलनी, गल्ली क्रमांक चार, पुष्पलता बिल्डींगजवळ, कोथरूड) असे खून झालेल्या रखवालदाराचे नाव आहे. याबाबत पोलीस उपनिरीक्षक धीरज गुप्ता यांनी अलंकार पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

मिळालेल्या अधिक माहितीनुसार, मृत तावरे, त्यांची आई, दोन मुले अर्धवट बांधकाम झालेल्या बंगल्यात राहायला आहेत. तावरे मद्यपी असल्याने पत्नीने सोडून दिले होते. तावरेचा भाऊ डहाणूकर कॉलनीतील एका इमारतीत रखवालदार आहे. तावरे अर्धवट झालेल्या बंगल्यात रखवालदार म्हणून काम करत होता. शुक्रवारी (25 डिसेंबर) तो बंगल्याच्या आवारात बेशुद्धावस्थेत पडल्याचे त्याच्या मुलाने पाहिले. त्यानंतर तावरेच्या भावाने त्याला रूग्णालयात दाखल केले. उपचारांपूर्वीच तो मरण पावला होता.

त्यानंतर या घटनेची माहिती अलंकार पोलिसांना मिळाली. पोलिसांनी त्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी ससून रूग्णालयात पाठवून दिला. शवविच्छेदन अहवालात तावरेचा गळा दाबल्याचे तसेच त्याला मारहाण झाल्याचे निष्पन्न झाले. या प्रकरणी अज्ञाताविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती अलंकार पोलीस ठाण्यातील गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजीवन जगदाळे यांनी दिली. तावरेच्या खुनामागचे कारण समजू शकले नाही. पोलीस निरीक्षक जगदाळे तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.