Dehuroad : क्राईम पेट्रोल बघून दोघांनी केलेला चोरीचा प्रयत्न फसला; बारा तासात पोलिसांकडून अटक

एमपीसी न्यूज – हातउसने घेतलेले पैसे फेडण्यासाठी व मौजमजा करण्यासाठी त्याने क्राईम पेट्रोल सिरीयल बघून लाखो रुपये चोरण्याचा बनाव रचला. पण पोलिसांच्या चौकशीत 12 तासात उघडा पडला. देहूरोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत बुधवारी (दि. 14) घडलेल्या दरोड्याच्या घटनेत फिर्यादीच आरोपी असल्याचे निष्पन्न झाले आहे. देहूरोड पोलीस आणि गुन्हे शाखा युनिट पाचच्या पोलिसांनी संयुक्त कारवाई करून दोघांकडून 34 लाख 39 हजार 463 रुपयांची रोकड जप्त करून हा गुन्हा उघड केला.

कुणाल रविंद्र पवार (वय 20), ओंकार उर्फ मोन्या बाळासाहेब भोगाडे (वय 21, दोघे रा. हनुमान कॉलनी, हुतात्मा चौक, भोसरी) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

सहाय्यक पोलीस आयुक्त श्रीधर जाधव यांनी दिलेल्या माहितीनुसार, कुणाल याने काही रक्कम हातउसनी घेतली होती. तसेच पैशांची उधळपट्टी करण्याची सवय असल्याने त्याला पैशांची चणचण भासू लागली. तो लॉजीकॅश कंपनीमध्ये काम करतो. ही कंपनी मोठी आर्थिक उलाढाल असलेल्या संस्थांकडून पैसे जमा करते आणि ते पैसे बँकेत जमा करते. या कंपनीत काम करत असल्याने त्याने क्राईम पेट्रोल ही सिरीयल बघून दरोडा टाकण्याचा कट रचला.

बुधवारी कुणाल याने भोसरी, दिघी, नाशिक फाटा, पिंपळे सौदागर, पिंपरी, चिंचवड, देहूगाव व देहूरोड येथून कंपनीची कॅश गोळा करुन ताथवडे येथे जात होता. त्यावेळी एक काळ्या रंगाच्या पल्सर दुचाकीवरून अंगामध्ये निळ्या रंगाचे जॅकेट घातलेल्या एका अज्ञात व्यक्तीने पिस्तुलाचा धाक दाखवून कुणालकडे जमा झालेली 33 लाख 30 हजार 464 कॅश जबरीने घेऊन गेला. याबाबत देहूरोड पोलीस ठाण्यात दरोड्याचा गुन्हा नोंदवला. यामध्ये कुणाल यानेच फिर्याद दिली.

गुन्हयाचा समांतर तपास गुन्हे शाखा पाचच्या पोलिसांनी केला. पोलिसांनी कुणालकडे झालेल्या घटनेबाबत चौकशी केली असता त्याच्या माहितीमध्ये तफावत आढळली. पोलिसांनी तांत्रिक मुद्द्यांच्या आधारे तपास केला असता कुणाल पोलिसांची दिशाभूल करत असल्याचे निष्पन्न झाले. तपासात कुणाल याच्यासोबत त्याचा मित्र ओंकार त्याला देहूरोड येथे भेटल्याचे आढळले. पोलिसांनी ओंकारला ताब्यात घेऊन कसून चौकशी करून त्याच्याकडून गुन्ह्यात वापरलेली दुचाकी जप्त केली. पोलिसांनी दोघांकडून 33 लाख 30 हजार 464 रक्कमेपैकी 33, लाख 24 हजार 463 रुपये रक्कम, गुन्हयामध्ये वापरलेली मोटार सायकल (एम एच 14 / एफ क्यु 2494), एक हिरो होंडा स्प्लेंडर मोटार सायकल (एम एच 14 / एफ झेड 5381) व 3 मोबाईल असा एकूण 34 लाख 39 हजार 463 रुपयांचा माल जप्त केला आहे.

ही कारवाई पोलीस आयुक्त आर के पद्मनाभन, अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उप आयुक्त सुधीर हिरेमठ, सहाय्यक पोलीस आयुक्त श्रीधर जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट पाचचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. विवेक मुगळीकर, देहुरोड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनिष कल्याणकर, सायबर सेलचे पोलीस उप निरीक्षक निलेश बोडखे व पोलीस कर्मचारी धनराज किरनाळे, मयूर वाडकर, फारुक मुल्ला, संदीप ठाकरे, स्वामीनाथ जाधव, ज्ञानेश्वर गाडेकर, दत्तात्रय बनसुडे, भरत माने, राजकुमार इघार, दयानंद भोसले, दयानंद खेडकर, श्यामसुंदर गुट्टे, राजेश कुरणे यांच्या पथकाने केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.