Wakad News : किरकोळ कारणावरून दहशत माजवणा-या 11 जणांवर गुन्हा; तिघांना अटक

एमपीसी न्यूज – कोजागिरी पौर्णिमेच्या कार्यक्रमात झालेल्या किरकोळ कारणावरून एका तरुणाला कोयत्याने मारण्याचा प्रयत्न करत कोयते हवेत फिरवून परिसरात दहशत निर्माण केली. तसेच तरुणाच्या कुटुंबियांना शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली. ही घटना बुधवारी (दि. 20) मध्यरात्री एक वाजता पडवळनगर, थेरगाव येथे अक्षयचंदन सोसायटी समोर घडली.

सागर वदक, करण सोनवणे, समीर इनामदार, शुभम म्हस्के, आसिफ मुजावर, करण जैसवार, राहुल माकर, आकाश शिंदे, अखिलेश माकर आणि अन्य दोन जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी सागर वदक, करण सोनवणे आणि राहुल माकर या तिघांना पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणी प्रकाश मल्लाप्पा देवणगाव (वय 26, रा. पडवळनगर, थेरगाव) यांनी गुरुवारी (दि. 21) वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, श्री शिव छत्रपती शिवाजी मित्र मंडळ, पडवळनगर यांच्या वतीने कोजागिरी पौर्णिमेनिमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात आरोपी सागर वदक याने फिर्यादी यांचा भाचा अधिक व भाजी यांच्याशी झालेल्या किरकोळ भांडणाचा राग मनात धरून त्याच्या अन्य साथीदारांना जमवले.

आरोपींनी कोयते हवेत फिरवून परिसरात दहशत निर्माण केली. आरोपी सागर याने फिर्यादी यांना कोयता मारला, मात्र तो चुकवून फिर्यादी घरात पळून गेले. त्यानंतर आरोपींनी फिर्यादी यांच्या घराच्या दरवाजा, खिडक्यांवर लाथा मारल्या. फिर्यादी व त्यांच्या कुटुंबियांना शिवीगाळ केली आणि ठार मारण्याची धमकी दिली. वाकड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.