Chinchwad News : शहरातील गुन्हेगारी टोळ्या पोलिसांच्या रडारवर; ‘गुंडा स्कॉड’ची सुरुवात

एमपीसी न्यूज – गजा मारणेच्या मिरवणुकीमुळे शहरातील सर्वच गुन्हेगारी टोळ्या पोलिसांच्या रडारवर आल्या आहेत. त्यामुळे पिंपरी-चिंचवड पोलीस ऍक्शन मूडमध्ये आले आहेत. याचाच एक भाग म्हणजे पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयात ‘गुंडा स्कॉड’ सुरू करण्यात आले. पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी नुकतेच याबाबतचे आदेश दिले आहेत. 

कुख्यात गुंड गजा मारणे याची तळोजा कारागृहातून सुटका झाली. कारागृहातून सुटल्यानंतर त्याच्या पिलावळीने त्याची जंगी मिरवणूक काढली. या मिरवणुकीत पुणे, पिंपरी चिंचवडसह परिसरातील शेकडो तरुण सहभागी झाले होते. सोशल मीडियावर गजाचे व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले.

कारागृहातून सुटल्यानंतर लगेच मिरवणूक काढत गजाने जणू पोलिसांना खुले आव्हानच दिले. त्याच्या या खुल्या आव्हानाची दखल महासंचालक कार्यालयाने घेतली. महासंचालक कार्यालयाकडून पुणे आणि पिंपरी-चिंचवड पोलिसांना याबाबत विचारणा देखील झाली. शिरगाव, हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल केल्यानंतर पोलिसांनी मिरवणुकीत सहभागी असलेली टाळकी आणि त्यांची वाहने जप्त करण्यास सुरुवात केली आहे.

गजा मारणेच नव्हे तर अन्य टोळ्यांची देखील मुस्कटदाबी करण्यासाठी पिंपरी चिंचवड पोलीस अॅक्शन मूडमध्ये आले आहेत. पिंपरी-चिंचवड पोलिसांनी शहरातील सर्वच टोळ्यांची मुस्कटदाबी करण्याचा मास्टर प्लॅन तयार केला आहे. त्यासाठी गुंडा स्कॉड सुरू करण्यात आले आहे.

सहाय्यक पोलीस आयुक्त प्रेरणा कट्टे म्हणाल्या, “भयमुक्त समाजासाठी गुंडा स्कॉडची निर्मिती करण्यात आली आहे. हे स्कॉड शहारातील छोट्या मोठ्या गुन्हेगारांवर लक्ष ठेऊन राहील. तसेच, शहरात गुन्हेगारीचे ओंगळवाणे प्रदर्शन होणार नाही याची खबरदारी घेतील. याव्यतिरिक्त तरुणांना गुन्हेगारीपासून परावृत्त करण्याची मोठी जबाबदारी स्कॉडवर राहणार आहे.”

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.