Maval Crime News : उर्से टोल नाक्यावर मध्य प्रदेशमधील अट्टल गुन्हेगार आणि पिंपरी चिंचवड पोलीस आमनेसामने

एमपीसी न्यूज – मध्य प्रदेश मधील अट्टल गुन्हेगार पिंपरी – चिंचवड पोलिसांच्या हद्दीतून जाणार असल्याची माहिती मिळाल्याने पोलिसांनी उर्से टोल नाक्यावर सापळा लावला. त्यावेळी गुन्हेगारांनी थेट पोलिसांच्या अंगावर कार घातली. ही घटना गुरुवारी (दि. 20) सकाळी घडली आहे. यामध्ये एक पोलीस गंभीर जखमी झाला असल्याची प्राथमिक माहिती आहे.

मध्य प्रदेश येथील अट्टल गुन्हेगार दोन कारमधून पिंपरी चिंचवड पोलिसांच्या हद्दीतून पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावरून जाणार असल्याची माहिती पिंपरी चिंचवड पोलिसांना मिळाली. पोलिसांनी लागलीच उर्से टोलनाक्यावर सापळा लावला. गुरुवारी सकाळी साडेअकरा वाजताच्या सुमारास दोन कार उर्से टोल नाक्यावरून पुढे जात असताना पोलिसांनी कार अडवण्याचा प्रयत्न केला. मात्र कार चालकाने कार न थांबवता थेट पोलिसांच्या अंगावर कार घातली. यामध्ये एक पोलीस गंभीर जखमी झाला आहे.

पिंपरी चिंचवड पोलिसांनी गुन्हेगारांना अडवून सहा जणांना ताब्यात घेतले. दरम्यान पोलीस आणि गुन्हेगार यांच्यात झटापट झाली. काहीजण उर्से टोल नाक्याजवळ असलेल्या डोंगरात पळून गेले आहेत. या घटनेची माहिती मिळताच पिंपरी चिंचवड पोलीस दलातील सर्व गुन्हे शाखेच्या पोलिसांनी उर्से टोल नाक्याकडे धाव घेतली.

दरम्यान पिंपरी चिंचवडचे अपर पोलीस आयुक्त डॉ. संजय शिंदे हे देखील स्वतः घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी आरोपींचा शोध सुरु केला आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.