Chakan : दौंडकरवाडीत विसर्जन मिरवणुकीत गंभीर मारामारी

एकाच गावातील दोन मिरवणुका आमनेसामने; दोघे गंभीर ; वीस जणांवर गुन्हा

एमपीसी न्यूज – बाराव्या दिवशी विसर्जनाची परंपरा असणाऱ्या एकाच गावातील दोन मिरवणुका गावच्या मुख्य चौकात समोरासमोर आल्यानंतर साउंड सिस्टीम बंद करण्यास सांगण्याच्या कारणावरून लोखंडी कोयते व तलवारींनी झालेल्या हाणामारीत दोघे जखमी झाले. ही धक्कादायक घटना शेलपिंपळगाव येथील दौंडकरवाडी (ता.खेड) येथे सोमवारी (दि.२४) रात्री साडेनऊच्या सुमारास घडली. याप्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात वीस जणांवर गंभीर मारहाण प्रकरणी मंगळवारी (दि.२५) पहाटे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लक्ष्मी दत्तात्रय दौंडकर (वय ४५, रा. दौंडकरवाडी, ता.खेड, जि.पुणे) व योगेश दत्तात्रय दौंडकर (वय २५, रा. दौंडकरवाडी, ता.खेड, जि.पुणे), अशी या घटनेत जखमी झालेल्या माय-लेकरांची नावे आहेत. योगेश दौंडकर यांनी याबाबत चाकण पोलिसांत दिलेल्या फिर्यादीवरून रोहन दत्तात्रय दौंडकर, राहुल रामदास दौंडकर, निलेश बाबाजी दौंडकर, अक्षय सुहास कामठे (सर्व रा. दौंडकरवाडी ता.खेड) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

योगेश दौंडकर यांनी दिलेल्या फिर्यादी नुसार दौंडकरवाडी गावांमध्ये शिवप्रेमी प्रतिष्ठान नावाची दोन वेगवेगळी गणेश मंडळे आहेत. दोन्ही मंडळे बाराव्या दिवशी गणपती विसर्जन करतात. सोमवारी (दि.२४) दोन्ही मंडळाच्या मिरवणुका रात्री साडेनऊच्या सुमारास गावातील मुख्य चौकात समोरासमोर आल्यानंतर गुन्हा दाखल झालेल्या वरील चौघांनी बाहेरगावाहून आणलेल्या त्यांच्या साथीदारांसह फिर्यादी योगेश यांच्या गणेश मंडळाच्या मिरवणुकीचे समोर येऊन ट्रॅक्टरमध्ये असलेले साऊंड सिस्टीम बंद करा, असे म्हणून दमदाटी केली.

त्यावर फिर्यादी योगेश त्याचप्रमाणे त्यांच्यासोबत असलेल्या गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांनी आमच्या साऊंड सिस्टिम ऑपरेटरला तुम्ही दमबाजी का करता ? असा जाब विचारला. त्याचा राग मनात धरून वरील चौघांनी बेकायदा जमाव जमवून लोखंडी तलवार, लोखंडी कोयते अशा घातक हत्यारांसह फिर्यादी योगेश व त्यांच्यासोबत असलेल्या अन्य साथीदारांवर जाऊन शिवीगाळ दमदाटी केली. त्यानंतर पंधरा ते वीस जणांच्या जमावाने फिर्यादी योगेश यास जबर मारहाण करून जखमी केले. भांडण सोडवण्यासाठी गेलेली फिर्यादीचे आई लक्ष्मीबाई दौंडकर यांच्यावर हल्लेखोरांपैकी एकाने लोखंडी कोयत्याने हल्ला केला. त्यात त्यांच्या डाव्या हाताला गंभीर दुखापत झाली आहे.

चाकण पोलिसांनी याप्रकरणी गंभीर मारहाणीचा गुन्हा दाखल असून अधिक तपास चाकण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील पवार व त्यांचे सहकारी करीत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.