Pune : ‘उंदीर आणि घुशी कोणत्या आकाराच्या होत्या ?’

पाटबंधारे अधिकाऱ्याच्या वक्तव्यावर आमदार डॉ. नीलम गोऱ्हे यांची टीका

एमपीसी न्यूज- नेमके उंदीर आणि घुशी कोण आहेत ? वीज विभाग की केबल टाकणाऱ्या खासगी कंपन्या याचा शोध पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी घ्यावा अशी टीका शिवसेनेच्या प्रवक्त्या आमदार डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केली आहे. उंदीर व घुशींमुळे मुठा उजवा कालव्याची भिंत पोखरली गेल्याच्या पाटबंधारे विभागातील अधिकाऱ्याच्या वक्तव्यावर नीलम गोऱ्हे यांनी वरील प्रतिक्रिया दिली. कालवा पोखरून काढणा-या उंदीर आणि घुशी कोणत्या आकाराच्या होत्या असा प्रतिप्रश्न त्यांनी केला. मुठा उजवा कालवा फुटल्याचा ठिकाणी गोऱ्हे यांनी भेट दिली त्यावेळी त्या बोलत होत्या.

नीलम गोऱ्हे म्हणाल्या की, पाटबंधारे विभाग आणि महानगरपालिका या दोन्ही यंत्रणांमध्ये ताळमेळ नसल्याने हा प्रकार घडला आहे. काही वृत्तपत्र तसेच शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी वारंवार या गोष्टी निदर्शनास आणून दिल्या तरी देखील यंत्रणांनी काम केले नाही. लोकांच्या जीवावर बेतेपर्यंत शासन शांत बसणार का असा सवाल त्यांनी केला. पुण्याला पालकमंत्री असले तरी पुणे अनाथ आहे. शिवसेना पीडित लोकांना मदत करत आहे. सुरक्षिततेचा विचार करून जलवाहिनी आणि कालव्याचे काम करायला हवे होते. पण पुणे महापालिकेतील आजी माजी सत्ताधाऱ्यांनी केल्याचे दिसत नाही.

या घटनेत एका कुटुंबातील मुलांच्या शिक्षणासाठी ठेवलेले दीड लाख रुपये वाहून गेले. या घटनेची दखल उद्धव ठाकरे यांच्या सूचनेनुसार पक्षातर्फे दीड लाखाचा धनादेश दिल्याचे गोऱ्हे यांनी सांगितले. यावेळी शिवसेना शहरप्रमुख चंद्रकांत मोकाटे, भारिपच्या अँड.वैशाली चांदणे, उपशहरप्रमुख किरण साळी, नगरसेवक बाळा ओसवाल, अशोक हरणावळ, राजेंद्र शिंदे, सुरज लोखंडे, अनिता परदेशी, गीता वर्मा, आदी उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.