Chinchwad : दिवाळीपूर्व खरेदीसाठी डी-मार्ट मध्ये तोबा गर्दी, सोशल डिस्टन्सिंगचे तीन तेरा

एमपीसी न्यूज – दिवाळी चार दिवसांवर येऊन ठेपली आहे. या पार्श्वभूमीवर खरेदीसाठी ठिक ठिकाणी नागरिक मोठ्या प्रमाणावर गर्दी करताना दिसून येत आहेत. आज (रविवारी) दिवाळीपुर्व खरेदीसाठी  डी-मार्ट मध्ये तोबा गर्दी पहायला मिळाली. सोशल डिस्टन्सिंगला धाब्यावर बसवून नागरिक मोठ्या संख्येने डी-मार्ट मध्ये दाखल झालेले पहायला मिळाले.

दिवाळीचे साहित्य खरेदी करण्यासाठी नागरिकांनी आज  डी-मार्टमध्ये मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. रविवार सुट्टीचा दिवस असल्याने डी-मार्ट उघडण्यापूर्वीच नागरिकांनी डी-मार्ट बाहेर गर्दी केली होती. मात्र  डी-मार्टमध्ये सोशल डिस्टन्सिंगचे तीन तेरा वाजल्याचे पहायला मिळाले. वृद्ध आणि लहान मुलांना गर्दीच्या ठिकाणी घेऊन जाणे टाळावे, असे आवाहन केले असताना देखील मोठ्या संख्येने वृद्ध नागरिक व लहान मुले डी-मार्टमध्ये उपस्थित होते.

डी-मार्टमध्ये सर्वच वस्तू एका छताखाली मिळत असल्याने याठिकाणी खरेदीसाठी नागरिक अधिक पसंती देतात. त्यामुळे दरवर्षी दिवाळीपूर्व खरेदीसाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी डी-मार्ट मध्ये पहायला मिळते. मात्र, यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर योग्य खबरदारी घेतली जावी आणि गर्दी टाळावी, असे आवाहन सर्वच स्तरातून केले जात असली तरी, नागरिक सोशल डिस्टन्सिंगला धाब्यावर बसवून खरेदीसाठी मोठी गर्दी करताना दिसत आहेत.

अजूनही शहरात कोरोनाचे रुग्ण सापडत आहेत. त्या पार्श्वभूमीवर अजूनही योग्य ती काळजी घेणे आवश्यक आहे. कोरोना संसर्गाचे प्रमाण कमी झाले असले तरी हद्दपार झाला नाही हे नागरिकांनी लक्षात ठेवणं आवश्यक आहे. लहान मुलं व वृद्धांना गर्दीच्या ठिकाणी घेऊन जाणे घातक ठरू शकते. त्यामुळे घराबाहेर पडताना योग्य ती खबरदारी घेऊन बाहेर पडणे गरजेचे आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.