chinchwad : ‘तारांगण ~विश्व हरवलेल्या ताऱ्यांचे..बंध प्रेमाचे’ या अनाथाश्रमातील मुलांसाठीचा सांस्कृतिक कार्यक्रम

एमपीसी न्यूज – शिवांजली हेल्पिंग हॅण्ड्स या ग्रुप मार्फत शनिवारी (दि.1) आयोजित करण्यात आला. शिवांजलीच्या स्वयंसेवकांमार्फत सण 2011 पासून अनाथाश्रमातील मुलांसाठी वर्षभर विविध शैक्षणिक, सांस्कृतिक व सामाजिक उपक्रमांचे आयोजन केले जाते. त्यांच्या सोबत सण उत्सव साजरे केले जातात, संगणक साक्षरतेचे धडे मुलांना देणे, इंग्रजी चे वर्ग चालविणे तसेच कुमारवयीन मुलींसाठी त्यांच्या आरोग्याच्या शिक्षणाची सोय करणे, सर्वाना शैक्षणिक साहित्य वाटप असे अनेक उपक्रम राबविले जातात.

पुणे व पिंपरी चिंचवड शहरातील सात अनाथाश्रमातील मुलामुलींना त्यांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळावा व समाजातील अन्य घटकांप्रमाणेच आपणही तेवढेच सक्षम आहोत ही जाणीव त्यांच्यात रुजवण्यासाठी उच्चशिक्षित मित्रांनी एकत्र येऊन ग्रुप च्या माध्यमातून तारांगण ची कल्पना सण 2017 पासून प्रत्यक्षात उतरवायला सुरुवात केली.

हे तारांगणचे तिसरे वर्ष आहे. प्रा. रामकृष्ण मोरे नाट्यगृहात आयोजित या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून भारतीय पोलीस सेवेत कार्यरत असलेले अनंत ताकवले उपस्थित होते. आश्रमातील मुलांच्या स्वागतासाठी विषेश करून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा घेरेवाडी येथील विद्यार्थांनी ढोल व लेझीम सादर केले.

ताकवले म्हणाले “समाजातील कोणीही व्यक्ती ही अनाथ नसून सनाथ आहे. कारण जन्मापासून मरेपर्यंत आपली नाळ ही निसर्गाशी जोडलेली असते. निसर्ग कोणालाही एकटं पडू देत नाही. त्यामुळे तुम्ही स्वत:मध्ये अनाथपणाची भावना मनी आणू नका. आज रथसप्तमी आहे. आणि त्या सूर्याप्रमाणे तुमच्या कार्याचं तेज सदैव तळपत राहिल पाहिजे. त्यासाठी लागणारी जिद्द, चिकाटी लहानपणापासूनच अंगात भिनली पाहिजे.

त्याचबरोबर पुढे ते म्हणाले की, समाजातील अनाथालय आणि वृध्दाश्रम यांची सांगड घातली पाहिजे. म्हणजे कोणीही स्वतःला एकटं समजणार नाही यासाठी योग्य कायद्याची गरज आहे. खूप शिका, खूप मोठे व्हा आणि आपल्या देशाचा नावलौकिक वाढवा.” कार्यक्रमप्रसंगी फॉक्स वॅगन या कंपनीचे CEO श्री स्टीफन यांनी एका आश्रमाला दत्तक घेऊन जागा देण्याची घोषणा केली.

“मुलांच्या अंगी सुप्तावस्थेत अनेक गुण असतात, त्यांना संधीची व प्रेरणेची गरज असते. तारांगणाचा हाच उद्देश आहे की त्यांच्या समोर समाजातील आदर्श उभे करून आत्मविश्वास निर्माण करणे व देशाचा सुजाण नागरिक बनविण्यासाठी हातभार लावणे”

– बाबासाहेब काळे

“समाजापासून दुरावलेले तारे जोडण्याचे व त्यांना चमकवण्यासाठी शिवांजली ग्रुप कटिबद्ध आहे” – सागर मिसाळ

तारांगणच्या निमित्ताने अनेक मान्यवर उपस्थित होते, त्यामध्ये अलकाताई धानिवले (जिल्हा परिषद सदस्य पुणे), गणेश धानिवले ( सामाजिक कार्यकर्ते), विजयालक्ष्मी भावसार( अध्यक्ष भावसार व्हिजन), राजीव भावसार
(जलदिंडी विश्वस्त), मनीषा हिंगणे, धनंजय शेडबाळे(सल्लागार स्मार्ट सिटी), निताताई पाडळे (नगरसेविका pcmc), लालासाहेब माने ( निसर्ग मित्र), सातपुते व विनीत दाते सावरकर मंडळ, भावसार व्हिजन इंडिया यांची उपस्थिती होती.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिवांजली तारांगणचे सर्व टीम सागर मिसाळ, बाबासाहेब काळे, कनिफ फत्तेपूरकर, तेजस थोरात, शबाना सय्यद, प्रथमेश पांचाळ, गुरुकुल सोल्यूशनचे सर्व सदस्य व मित्रपरिवार यांचा विशेष सहभाग होता.


MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.