Nigdi : पोटाच्या भुकेइतकीच सांस्कृतिक भूक महत्त्वाची – हास्यकलाकार गजानन पातुरकर

एमपीसी न्यूज – पोटाच्या भुकेइतकीच सांस्कृतिक भूक महत्त्वाची असते, असे प्रतिपादन ज्येष्ठ एकपात्री हास्यकलाकार गजानन पातुरकर यांनी केले.

Manobodh by Priya Shende Part 101 : मनोबोध भाग 101- जया नावडे नाम त्या येम जाची

मधुश्री कला आविष्कार आणि निगडी (Nigdi) प्राधिकरण ज्येष्ठ नागरिक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित तीन दिवसीय मधुश्री व्याख्यानमालेत ‘हास्यविनोदातून समाजप्रबोधन’ या विषयावरील द्वितीय पुष्प गुंफताना गजानन पातुरकर बोलत होते. माजी नगरसेविका शर्मिला बाबर अध्यक्षस्थानी होत्या; तसेच प्राधिकरण ज्येष्ठ नागरिक संघाचे कार्याध्यक्ष भगवान महाजन, मधुश्री कला आविष्कारच्या अध्यक्ष माधुरी ओक, कार्याध्यक्ष सलीम शिकलगार, सचिव राजेंद्र बाबर यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती; त्याचप्रमाणे विविध सामाजिक, साहित्यिक आणि सांस्कृतिक संस्थांचे बहुसंख्य पदाधिकारी सभागृहात उपस्थित होते.

गजानन पातुरकर पुढे म्हणाले की, “दिवसेंदिवस सुसंवाद, वाचन या गोष्टी झपाट्याने कमी होऊ लागल्या आहेत. आताच्या यांत्रिक जीवनात सुखकर जगण्यासाठी सकारात्मकता आचरणात आणण्याची गरज आहे. पाहाल तशी दुनिया आहे; त्यामुळे जगाकडे हसून पाहिले तर जगदेखील तुमच्या हास्यात सहभागी होईल. माणूस हा एकमेव हसणारा प्राणी असल्याने संधी मिळेल तेव्हा मनमुरादपणे हसा. हसल्याने रक्ताभिसरण चांगले होते. पुस्तके वाचताना माणसेही वाचायला शिका!”

शेरोशायरी, कविता, किस्से, विनोद यांची पखरण करीत पातुरकर यांनी बदललेल्या जीवनशैलीतील स्थित्यंतरे मार्मिकपणे मांडून श्रोत्यांना खळखळून हसवले. हसण्याचे प्रकार, सुप्रसिद्ध सिनेकलावंतांचे आवाज आणि “येरे येरे पावसा…” ही बालकविता वेगवेगळ्या कलाकारांच्या आवाजात सादर करीत त्यांनी रसिकांकडून उत्स्फूर्त हशा अन् टाळ्या वसूल केल्या. मोबाइलचे दुष्परिणाम सांगून ‘आई’ या कवितेने आपल्या व्याख्यानाचा समारोप करताना गजानन पातुरकर यांनी श्रोत्यांना अंतर्मुख केले.

शर्मिला बाबर यांनी शुभेच्छा दिल्या. राजेंद्र बाबर यांनी प्रास्ताविक केले. अजित देशपांडे यांनी परिचय करून दिला. राज अहेरराव यांनी स्वागत केले. मधुश्री कला आविष्कार आणि प्राधिकरण ज्येष्ठ नागरिक संघाच्या कार्यकारिणीने संयोजनात परिश्रम घेतले.

अश्विनी कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले. उज्ज्वला केळकर यांनी आभार मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.