Pimpri : जानेवारीत होणार पवनाथडी जत्रा, पिंपरी की सांगवी स्थळाबाबत उत्सुकता

एमपीसी न्यूज –  महिला बचतगटांनी तयार केलेल्या वस्तूंना हक्काची बाजारपेठ उपलब्ध व्हावी, या उद्देशाने पिंपरी महापालिकेतर्फे या आर्थिक वर्षात देखील पवनाथडी जत्रा भरविण्यात येणार आहे. जानेवारी 2020 च्या पहिल्या किंवा दुस-या आठवड्यात जत्रा भरविण्यात येणार आहे. पिंपरीतील एच.ए.ग्राऊंड आणि सांगवीतील पी.डब्ल्यू.डी या दोन मैदानाचे पर्याय सुचविण्यात आले आहेत. त्यापैकी जत्रा कोठे होणार याची उत्सुकता आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या महिला व बालकल्याण समितीची पाक्षिक सभा आज (गुरुवारी) पार पडली. सभापती निर्मला कुटे सभेच्या अध्यक्षस्थानी होत्या.  या सभेत पवनाथडी जत्रा घेण्याच्या प्रस्तावाला मान्यता देण्यात आली.

पुण्यातील भीमथडी जत्रेच्या धर्तीवर पिंपरी-चिंचवड महापालिकेने सुमारे बारा वर्षांपूर्वीपासून पवनाथडी जत्रा भरविण्यास सुरुवात केली. महापालिका हद्दीतील महिला बचतगटांनी तयार केलेल्या वस्तूंना हक्कांची बाजारपेठ उपलब्ध व्हावी. या उद्देशाने महापालिकेतर्फे महिला व बाल कल्याण योजने अंतर्गत पवनाथडी जत्रेचे आयोजन केले जाते. यंदाचे हे 13 वे वर्ष आहे.

महिला व बालकल्याण समितीच्या आज झालेल्या सभेत सन 2019-2020 या आर्थिक वर्षात पवनाथडी जत्रा भरविण्याचा ठराव नगरसेविका सुजाता पालांडे आणि निकीता कदम यांनी मांडला होता. या आर्थिक वर्षात पिंपरीतील एच.ए.ग्राऊंड आणि सांगवीतील पी.डब्ल्यू.डी यापैकी एका ठिकाणी पवनाथडी जत्रा भरविण्यात यावी.

जानेवारी 2020 च्या पहिल्या अथवा दुस-या आठवड्यामध्ये जत्रा भरविण्यात यावी. तसेच जत्रेच्या आयोजनासाठी केलेल्या तरतुदीमधून, तरतूद कमी पडल्यास आवश्यकतेनुसार महिला व बालकल्याण योजनेअंतर्गत इतर योजना कार्यक्रम व तरतुदीतून खर्च करण्यात यावी. यासाठी प्रत्यक्ष येणा-या खर्चास मान्यतादेण्यासाठी स्थायी समितीकडे शिफारस केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.