Hinjawadi : ऑनलाईन शॉपिंग साईटकडून ग्राहकाची फसवणूक

एमपीसी न्यूज – ऑनलाईन विकत घेतलेल्या पॅन्टचे पैसे परत पाठविण्याच्या बहाण्याने ग्राहकाला ओटीपी मागितला. त्याद्वारे ग्राहकाचे 65 हजार रुपये ऑनलाईन काढून घेतले. याप्रकरणी सहा महिन्यांनी शनिवारी (दि.24) हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

अभिजीत कुमार नाचणकर (वय 32, रा.कस्तुरी चौक, हिंजवडी) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. संबंधित मोबाइलधारकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नाचणकर यांनी 5 फेब्रुवारीला ‘टी कमीज’ या संकेतस्थळाहून पॅन्ट मागवली. ऑर्डर आली असता पॅन्ट लहान असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी पैसे रिफंड करण्यासाठी संकेस्थळावर तक्रार केली. दरम्यान त्यांना आरोपी मोबाइलधारकाचा फोन आला. पैसे परत मिळविण्यासाठी तुम्हाला एक कोड येईल तो  9004676782 या  नंबरवरती पाठविण्यास सांगितले. त्यानंतर नाचणकर यांच्या मोबाईलवर आलेला ओटीपी त्यांनी 9004676782 या नंबरवर पाठवला. त्यानंतर काही वेळातच त्यांच्या खात्यातून 65 हजार 184 रुपये ऑनलाईन हस्तांतरित झाल्याचा मेसेज आला. माहिती घेतली असता ओटीपीचा गैरवापर करून पैसे हस्तांतरित केल्याचे समोर आले. त्यांनी दिलेल्या तक्रार अर्जानुसार पडताळणी करून सहा महिन्यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.