Hinjawadi : किरकोळ कारणावरून बिर्याणी हाऊसमध्ये ग्राहकांचे आपसात भांडण; परसपर विरोधात गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – बिर्याणी हाऊसमध्ये जेवण करण्यासाठी गेलेल्या ग्राहकांमध्ये एकमेकांकडे बघण्यावरून वाद झाला. दोन्ही गटांनी एकमेकांना मारहाण केली. ही घटना मंगळवारी (दि. 1) दुपारी तीनच्या सुमारास महाळुंगे येथील ए वन बिर्याणी हाऊस येथे घडली. याप्रकरणी आपसात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

सुरज मनोज दगडे (वय 19, रा बावधन बुद्रुक, ता. मुळशी) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार, निखिल विजय दगडे (रा. बावधन बुद्रुक, ता. मुळशी) आणि त्याच्या तीन साथीदारांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सूरज याने दिलेल्या फिर्यादीनुसार, सूरज त्याच्या मित्रांसोबत महाळुंगे येथील ए वन बिर्याणी हाऊसमध्ये जेवण करण्यासाठी गेला. त्यावेळी आरोपीने ‘तू आमच्याकडे कशाला बघतोस’ असे म्हणत सूरज यांना लोखंडी रॉडने मारहाण केली. ही भांडणे सोडविण्यासाठी सूरजचा मित्र कुमार आरडे हा आला असता आरोपींनी त्याला देखील मारहाण केली. आरोपींनी सूरज यांना जीवे मारण्याची धमकी दिली. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याच्या परस्पर विरोधात अक्षय राजेंद्र चांदेरे (वय 19, रा. विरभद्र नगर, बाणेर) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार, सुरज मनोज दगडे (वय 19), कुमार रमेश आरडे (दोघे रा. बावधन) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अक्षय याने दिलेल्या फिर्यादीनुसार, अक्षय त्याच्या मित्रांसोबत जेवण करण्यासाठी महाळुंगे येथील ए वन बिर्याणी हाऊसमध्ये गेला होता. त्यावेळी आरोपी सूरज हा अक्षय याचा मित्र निखिल याच्याकडे बघत होता. याबाबत ‘काय बघतोस’ असे विचारल्यावरून आरोपींनी निखिलला शिवीगाळ करून लोखंडी रॉडने मारून जखमी केले. अक्षय भांडणे सोडविण्याचा प्रयत्न करीत असताना आरोपींनी अक्षयला देखील मारहाण केली. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हिंजवडी पोलीस दोन्ही गुन्ह्यांचा तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.