Cyber Crime: कोरोनाला धार्मिक रंग देणारा व्हिडिओ व्हायरल; महाराष्ट्र सायबरकडून पिंपरी-चिंचवडमध्ये गुन्हा दाखल

Cyber ​​Crime Corona pandemic Religious Video Viral; fir filed in Pimpri-Chinchwad by Maharashtra Cyber महाराष्ट्रात लॉकडाऊनच्या काळात समाजमाध्यमांचा गैरवापर करून आक्षेपार्ह पोस्ट केल्याप्रकरणी 499 विविध गुन्हे महाराष्ट्र सायबरने दाखल केले आहेत.

एमपीसी न्यूज- कोरोना विषाणूच्या महामारीला धार्मिक रंग देणारा व्हिडिओ टिकटॉकवर या सोशल मीडियावर व्हायरल केल्याप्रकरणी पिंपरी-चिंचवड शहरात महाराष्ट्र सायबर विभागाकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशी माहिती महाराष्ट्र सायबरच्या विशेष पोलीस महानिरीक्षकांनी दिली.

टिकटॉकवर व्हायरल केलेल्या व्हिडिओमध्ये कोरोना महामारीबाबत धार्मिक रंग देण्यात आला होता. यामुळे परिसरात काही काळ तणाव निर्माण झाला होता. कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला असता, यामुळे सायबर विभागाने तात्काळ पावले उचलून गुन्हा दाखल केला आहे.

महाराष्ट्रात लॉकडाऊनच्या काळात समाजमाध्यमांचा गैरवापर करून आक्षेपार्ह पोस्ट केल्याप्रकरणी 499 विविध गुन्हे महाराष्ट्र सायबरने दाखल केले आहेत. यामध्ये एकूण 261 व्यक्तींना अटक करण्यात आली आहे, आतापर्यंत 107 आक्षेपार्ह पोस्ट्स समाजमाध्यमांवरून हटविण्यात सायबर विभागाला यश आले आहे.

आक्षेपार्ह संदेश, पोस्टर्स, व्हिडिओ, ट्विट पोस्टस, शेअर केल्याप्रकरणी प्लॅटफॉर्मनिहाय गुन्हे दाखल

व्हॉट्सअप – 195 गुन्हे

फेसबुक पोस्ट्स – 206 गुन्हे

टिकटॉक व्हिडिओ – 27 गुन्हे

ट्विटर – आक्षेपार्ह ट्विट – 9 गुन्हे

इन्स्टाग्राम – चुकीच्या पोस्ट – 4 गुन्हे

अन्य सोशल मीडिया (ऑडिओ क्लिप्स, युट्यूब) गैरवापर – 58 गुन्हे

महाराष्ट्र सायबरचे आवाहन

शासनाने कोरोना महामारीच्या काळात म्हणून सर्वसामान्य जनतेच्या हालचालींवर काही निर्बंध आखून दिले होते व त्याकरिता नियम देखील केले होते . सध्याच्या काळात सरकारने हे घातलेले निर्बंध, नियम आणि अटी या शिथिल केल्या आहेत व ज्यामुळे सर्वसामान्य जनतेला आपले दैनंदिन जीवन पूर्वपदावर येण्यास मदत होईल.

मात्र, गेल्या दोन दिवसांपासून विविध सोशल मीडियावर काही मेसेज व पोस्ट फिरत आहेत की, “सर्वसामान्य जनता सोशल डिस्टनसिंग व अन्य काही नियमांचे पालन करत नाही, त्यामुळे सर्व शिथिल केलेल्या अटी, नियम व निर्बंध सरकार पुढे चालू ठेवणार आहे.”

वरील नमूद आशयाचा मजकूर खोटा असून अशा कोणत्याही मेसेज व पोस्टवर विश्वास ठेवू नका व तुम्हीदेखील कोणाला फॉरवर्ड करू नका, असे आवाहन महाराष्ट्र सायबरने केले आहे.

कोरोना महामारी संदर्भातील कोणत्याही माहितीबाबत केंद्र व राज्य सरकार हे नागरिकांना नियमितपणे अधिकृतरीत्या निवेदन करून सर्व माहिती तपशीलवारपणे देत असते, त्यामुळे सर्व नागरिकांनी फक्त त्याच माहितीवर विश्वास ठेवावा. तुम्ही जर व्हॉट्सअप ग्रुप अॅडमिन किंवा ग्रुप क्रियटर असाल व त्या ग्रुपवर कोणी असे मेसेज पाठवत असेल तर त्या ग्रुप सदस्यास तात्काळ ग्रुपमधून काही काळाकरिता काढावे.

ग्रुप सेटिंग्ज बदलून ओन्ली ऍडमिन असे करण्याच्या सूचनाही महाराष्ट्र सायबरने दिल्या आहेत. अफवा पसरविणे हा कायदेशीर गुन्हा तर आहेच पण एक सामाजिक गुन्हा देखील आहे, हा गुन्हा करणाऱ्यांवर कठोर कारवाईचा इशारा महाराष्ट्र सायबरने दिला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.