Cyber Crime: मिटिंगसाठी झूम ऍप वापरताय, मग सावधान; महाराष्ट्र सायबरचे आवाहन

Cyber ​​Crime: Use the Zoom app for meetings, then beware; Maharashtra Cyber ​​Appeal सायबर भामट्यांनी बनविलेली झूम ऍप सदृश काही मालवेअर जर डाऊनलोड केली, तर तुमच्या सर्व मिटिंग रेकॉर्ड होतील व तुमची सर्व माहिती त्यांना मिळू शकते

एमपीसी न्यूज- सध्या अनेकजण घरुन काम (वर्क फ्रॉम होम) करत आहेत. ऑनलाईन मिटिंगसाठी वापरायला सोपे असल्याने झूम या सॉफ्टवेअरचा जास्त प्रमाणात उपयोग होत आहे. सायबर भामट्यांनी झूम ऍप सदृश काही मालवेअर व खोटे ऍप्स बनवली आहेत. त्यामुळे हे ऍप वापरताना सावधानता बाळगणे आवश्यक आहे, असे आवाहन ‘महाराष्ट्र सायबर’ने केले आहे.

आपल्या सहकाऱ्यांबरोबरच्या ऑनलाईन मिटिंगसाठी झूम, मायक्रोसॉफ्ट मिटिंग, स्काईप, सिस्को वेबेक्स (झूम, मायक्रोसॉप्ट मिटिंग्ज, स्काइप, सिस्को वेबक्स) आदी सॉफ्टवेअर आणि ऍप्स वापरली जात आहेत. झूम त्यामध्ये वापरायला सोपे असल्याने या सॉफ्टवेअरचा जास्त प्रमाणात उपयोग होत आहे.

सायबर भामट्यांनी बनविलेली झूम ऍप सदृश काही मालवेअर जर डाऊनलोड केली, तर तुमच्या सर्व मिटिंग रेकॉर्ड होतील व तुमची सर्व माहिती त्यांना मिळू शकते व तुमच्या मोबाईल किंवा संगणकाचा ताबादेखील हे सायबर भामटे घेऊ शकतात.

‘महाराष्ट्र सायबर’ने सर्व नागरिकांना विशेष करून झूम ऍप वापरणाऱ्यांना हे ऍप वापरताना सावध राहण्याचे आवाहन केले आहे.

झूम ऍप हे अधिकृत वेबसाईट किंवा प्ले स्टोअरवरूनच डाउनलोड करावे. शक्यतो कुठलीही गोपनीय माहिती अशा मिटिंगमध्ये बोलणे टाळावे किंवा संबंधित लोकांशी थेट बोलूनच त्यांना ही माहिती द्यावी. मिटिंग ॲडमिनने मिटिंगचे आयडी व पासवर्ड हे शक्यतो संबंधित व्यक्तींनाच थेट कळवावेत.

तसेच सदर पासवर्ड हा थोडा क्लिष्ट ठेवावा जेणेकरून एखाद्या दुसऱ्या व्यक्तीस तो समजण्यास कठीण जाईल. तसेच संबंधित मिटिंग ऍडमिन/होस्टने फक्त मिटिंगच्या विषयाच्या संबंधित व्यक्तींचीच लॉगिन रिक्वेस्ट स्वीकारावी.

तुम्ही जर मिटिंग होस्ट असाल तर पुढील बाबी लक्षात ठेवणे गरजेचे आहे

* तुम्हाला जो रँडम मिटिंग आयडी व पासवर्ड मिळेल त्याचाच शक्यतो वापर करा, तुमचा कुठलाही आयडी किंवा पासवर्ड वापरू नका .

* तुम्ही मिटिंग सेटिंग अशा प्रकारे बदल करा की तुमच्याशिवाय मिटिंग मधील अन्य कोणीही व्यक्ती ती रेकॉर्ड करू शकणार नाही .

* मिटिंगमध्ये सर्व अपेक्षित व्यक्तींनी लॉगिन केल्यावर सदर मिटिंग लॉक करा जेणेकरून अन्य कोणी व्यक्ती त्यात अनाहूतपणे लॉगिन करू शकणार नाही .

* मिटिंग सेटिंग अशी करा की तुमच्या आधी व तुमच्या परवानगीशिवाय कोणी त्यात लॉगिन करू शकणार नाही.

* तुम्ही जर काही कारणाने मिटिंग सोडून जात असाल किंवा मिटिंग संपली असेल तर लीव्ह मिटिगचा पर्याय न वापरता एंड मिटिंगचा पर्याय वापरा.

* मिटिंगची लिंक आयडी व पासवर्ड ओपन फोरमवर शेअर करू नका.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.