Cyber Crime : कोरोना महामारीला धार्मिक रंग देणारा व्हिडिओ टिकटॉकवर प्रसारित केल्याबाबत जळगावात गुन्हा

Crime in Jalgaon over video broadcast on Corona epidemic

राज्यात लॉकडाऊनच्या काळात सायबरचे 478 गुन्हे दाखल; 258 लोकांना अटक

एमपीसी न्यूज – कोरोना महामारीला धार्मिक रंग देणारा एक व्हिडिओ जळगाव जिल्ह्यात टिकटॉक या सोशल मीडियावर प्रसारित झाला होता. याबाबत पोलिसांनी तात्काळ व्हिडिओ प्रसारित करणा-यावर गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे, अशी माहिती महाराष्ट्र सायबरच्या विशेष पोलीस महानिरीक्षकांनी दिली आहे.

जळगाव जिल्ह्यातील फैजापूर पोलीस ठाण्यामध्ये या गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. यामुळे कोरोना काळात जळगाव जिल्ह्यात सायबर गुन्ह्यांचा आकडा 34 वर गेला आहे.

टिकटॉकवर व्हिडिओ व्हायरल झाल्याने काही काळ तणाव निर्माण झाला होता. यामुळे पुढे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असल्याने पोलिसांनी तात्काळ कारवाई केली आहे.

लॉकडाऊनच्या काळात राज्यामध्ये समाजमाध्यमांचा गैरवापर करुन आक्षेपार्ह पोस्टस केल्याप्रकरणी 478 विविध गुन्हे महाराष्ट्र सायबरने दाखल केले आहेत.

त्यात 258 व्यक्तींना अटक करण्यात आली आहे. तर 107 आक्षेपार्ह पोस्ट्स समाजमाध्यमांवरून हटविण्यात सायबर विभागाला यश आले आहे.

आक्षेपार्ह संदेश, पोस्टर्स, व्हिडिओ, ट्विट पोस्टस, शेअर केल्याप्रकरणी दाखल झालेले गुन्हे –

# व्हॉट्स अप- 195

# फेसबुक पोस्ट्स – 195

# टिकटॉक व्हिडिओ- 24

# ट्विटर – आक्षेपार्ह ट्विट – 9

# इंस्टाग्राम – 4

# अन्य सोशल मीडिया ( ऑडिओ क्लिप्स, युट्यूब) गैरवापर – 51

व्हायरल होणारा मेसेज खोटा; महाराष्ट्र सायबरचे आवाहन

शासनाने कोरोना महामारीच्या काळात सर्वसामान्य जनतेच्या हालचालींवर काही निर्बंध आखून दिले होते व त्याकरिता नियम देखील केले होते.

सध्याच्या काळात सरकारने हे निर्बंध, नियम आणि अटी या शिथिल केल्या आहेत. ज्यामुळे सर्वसामान्य जनतेला आपले दैनंदिन जीवन पूर्वपदावर येण्यास मदत होईल.

मात्र, मागील काही दिवसांपासून विविध सोशल मीडियावर काही मेसेज व पोस्ट फिरत आहेत. यामध्ये “सर्वसामान्य जनता सोशल डिस्टनसिंग व अन्य काही नियमांचे पालन करत नाही, त्यामुळे सर्व शिथिल केलेल्या अटी, नियम व निर्बंध सरकार पुढे चालू ठेवणार आहे.” या पोस्टचा समावेश आहे.

या आशयाचा मजकूर खोटा असून अशा कोणत्याही मेसेज व पोस्टवर नागरिकांनी विश्वास ठेवू नये. तसेच नागरिकांनी असे मेसेज फॉरवर्ड करू नयेत, असे आवाहन महाराष्ट्र सायबरकडून करण्यात आले आहे.

कोरोना महामारी संदर्भातील कोणत्याही माहितीबाबत केंद्र व राज्य सरकार हे नागरिकांना नियमितपणे अधिकृतरीत्या निवेदन करून सर्व माहिती तपशीलवारपणे देत आहे. त्यामुळे सर्व नागरिकांनी फक्त त्याच माहितीवर विश्वास ठेवावा.

व्हाट्स अप ग्रुप ॲडमिनसाठी सूचना

व्हॉट्स अप ग्रुप ॲडमिन किंवा ग्रुप क्रिएटर असाल व त्या ग्रुपवर कोणी अफवा पसरविणारे मेसेज पाठवत असेल तर त्या ग्रुप सदस्याला तात्काळ ग्रुपमधून काही काळाकरिता काढून टाकावे.

ग्रुप settings बदलून only admins असे करण्याच्या सूचनाही महाराष्ट्र सायबरने दिल्या आहेत.

अफवा पसरविणे हा कायदेशीर गुन्हा तर आहेच पण एक सामाजिक गुन्हा देखील आहे, हा गुन्हा करणाऱ्यांवर कठोर कारवाईचा इशारा महाराष्ट्र सायबरने दिला आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.