Cyber Crime : ‘केबीसी’मधील लकी ड्रॉच्या मेसेजने हुरळून जाऊ नका, फसवणूक होऊ शकते; ‘महाराष्ट्र सायबर’चे आवाहन

Don't get carried away by the lucky draw message in 'KBC', cheating can happen; Appeal of 'Maharashtra Cyber'

कोरोना काळात 467 सायबर गुन्ह्यांची नोंद; 255 व्यक्तींना अटक

एमपीसी न्यूज – कौन बनेगा करोडपती (केबीसी) या स्पर्धेत तुम्हाला पारितोषिक मिळालेले आहे. तुम्हाला लकी ड्रॉ लागला आहे. तुम्हाला कार गिफ्ट मिळणार आहे. अशा प्रकारचे मेसेज आले अथवा +92 या क्रमांकाने सुरु होणा-या नंबरवरून फोन आल्यास हुरळून जाऊ नका. तो तुमचे बँक खाते रिकामे करण्यासाठी लावलेला सापळा असू शकतो. त्यामुळे खातरजमा करूनच प्रत्येक वेळी ऑनलाईन आर्थिक व्यवहार करा. तसेच आपल्या बँक खात्याची माहिती कुणालाही शेअर करू नका, असे आवाहन महाराष्ट्र सायबर विभागाकडून करण्यात आले आहे.

सायबर भामट्यांद्वारे ऑनलाईन आर्थिक फसवणूकीचे गुन्हे केले जात आहेत. या गुन्ह्यांमध्ये सध्याच्या काळात वाढ झाली आहे. त्यात या परिस्थितीचा फायदा घेण्याचा प्रयत्न आपले शेजारील देश देखील करीत आहेत.

बऱ्याच लोकांना +92 या अंकांनी सुरु होणाऱ्या मोबाईल क्रमांकावरून कॉल येतो किंवा व्हाट्सअँप मेसेज अथवा एसएमएस येतो.

त्या कॉलवरील व्यक्ती तुम्हाला सांगते कि ‘तुम्हाला कौन बनेगा कोरोडपती’ या सुप्रसिद्ध खेळामध्ये काही रकमेचे पारितोषिक मिळाले आहे. त्या पारितोषिकाची रक्कम तुमच्या खात्यामध्ये जमा करायची आहे.

त्यासाठी तुमच्या बँक खात्याची सर्व माहिती पाहिजे, असे म्हणून नागरिकांच्या क्रेडिट व डेबिट कार्डांचे पिन क्रमांक देखील घेतले जातात. त्याद्वारे बँक खात्यातून परस्पर पैसे ट्रान्सफर करून फसवणूक केली जाते.

अशाच आशयाचा संदेश तुम्हाला व्हाट्सअँप किंवा ,एसएमएस,वर येतो. त्यात लिंक दिलेली असते. त्या लिंकवर क्लिक केल्यास तुम्हाला एक फॉर्म भरायला सांगितला जातो. त्यामध्ये तुमचे सर्व बँक खात्याचे डिटेल्स मागितले जातात.

ते सर्व भरले कि confirmation करता +92 या अंकांनी सुरु होणाऱ्या मोबाईल क्रमांकावरून एक कॉल येतो. कॉलवरील व्यक्ती बोलता बोलता त्याच वेळेस नागरिकांच्या फोनवर आलेला ओटीपी (वन टाइम पासवर्ड) विचारतो.

आपण जर ओटीपी दिला तर कॉल disconnect होतो. त्यानंतर काही वेळेतच आपल्याला लक्षात येते कि, आपल्याच खात्यातून काही रक्कम दुसऱ्या खात्यात ट्रान्सफर झाली आहे.

याच गुन्ह्याचा दुसरा प्रकार म्हणजे अश्याच +92 या अंकांनी सुरु होणाऱ्या मोबाईल क्रमांकावरून कॉल येतो. सदर कॉलवरील व्यक्ती तुम्हाला सांगते कि, ‘तुम्हाला लकी ड्रॉमध्ये एक कार मिळाली आहे.

तुम्ही त्याकरिता एका विशिष्ट खात्यामध्ये त्या गाडीच्या transportation चा खर्च व टोलचा खर्च म्हणून एक ठराविक रक्कम जमा करा. नंतर तुम्हाला गाडीची डिलिव्हरी दिली जाईल’.

तुम्ही रक्कम भरल्यावर त्या मोबाईल क्रमांकावर परत कॉल करायचा प्रयत्न केल्यास तो नंबर अस्तित्वात नसतो.

अशा प्रकारच्या फसवणुकीवर आळा घालण्यासाठी महाराष्ट्र सायबर विभाग लक्ष ठेऊन आहे. +92 या अंकांनी सुरु होणाऱ्या मोबाईल क्रमांकावरून येणारे कोणतेही फोन कॉल्स उचलू नका.

अशा नंबरवरून येणाऱ्या मेसेज मधील लिंकवर क्लिक करू नका. तसेच कोणत्याही लिंकवर किंवा कोणत्याही अनोळखी व्यक्तीस आपल्या बँक खात्याची सर्व माहिती, डेबिट/क्रेडिट कार्ड डिटेल्स शेअर करू नका, असे आवाहन महाराष्ट्र सायबर विभागाने केले आहे.

जर कोणत्याही व्यक्तीस वरील नमूद मजकूर असणाऱ्या आशयाचे मेसेजेस आले तर घाबरून जाण्याचे कारण नाही.

आपण आपल्या जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये या गुन्ह्याची तक्रार नोंदवा व www.cybercrime.gov.in या वेबसाईटवर देखील याची माहिती द्या, असे आवाहनही महाराष्ट्र सायबर विभागामार्फत करण्यात आले आहे.

कोरोना काळात 467 सायबर गुन्ह्यांची नोंद; 255 व्यक्तींना अटक

लॉकडाऊनच्या काळात राज्यामध्ये काही गुन्हेगार व समाजकंटक गैरफायदा घेण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांच्याविरुद्ध महाराष्ट्र सायबर विभागाने कठोर पाऊले उचलली आहेत.

राज्यात सायबर संदर्भात 467 गुन्हे दाखल झाले असून 255 व्यक्तींना अटक केली आहे, अशी माहिती महाराष्ट्र सायबर विभागाच्या विशेष पोलीस महानिरीक्षकांनी दिली आहे.

राज्यातील विविध पोलीस स्टेशनमध्ये 9 जून 2020 पर्यंत एकूण 467 गुन्ह्यांची (ज्यापैकी 30 अदखलपात्र आहेत) नोंद

या सर्व गुन्ह्यांचे महाराष्ट्र सायबरने जेव्हा विश्लेषण केले तेव्हा असे निदर्शनास आले की आक्षेपार्ह व्हाट्सअप मेसेजेस फॉरवर्ड केल्याप्रकरणी 193 गुन्हे दाखल झाले आहेत.

आक्षेपार्ह फेसबुक पोस्ट्स शेअर केल्याप्रकरणी 190 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. टिकटॉक व्हिडिओ शेअरप्रकरणी 23 गुन्हे दाखल झाले आहेत. ट्विटरद्वारे आक्षेपार्ह ट्विट केल्याप्रकरणी 8 गुन्हे दाखल झाले आहेत.

इंस्टाग्रामवरून चुकीच्या पोस्ट टाकल्याप्रकरणी 4 गुन्हे दाखल झाले आहेत .तर अन्य सोशल मीडियाचा (ऑडिओ क्लिप्स, youtube) गैरवापर केल्याप्रकरणी 49 गुन्हे दाखल झाले आहेत

या सर्व गुन्ह्यांमध्ये आतापर्यंत 255 आरोपींना अटक केली आहे. तर यापैकी 107 आक्षेपार्ह पोस्ट्स takedown करण्यात यश आले आहे.

नाशिक ग्रामीणमध्ये एका गुन्ह्याची नोंद

नाशिक ग्रामीण पोलीस जिल्ह्यातील दिंडोरी पोलीस स्टेशनमध्ये एका गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे या विभागातील नोंद झालेल्या गुन्ह्यांची संख्या 18 वर गेली आहे.

सदर गुन्ह्यातील आरोपीने कोरोना महामारीला धार्मिक रंग देणाऱ्या आशयाचा मजकूर असणारी पोस्ट आपल्या फेसबुक प्रोफाईलवरून शेअर केली होती.

त्यामुळे परिसरात अफवा पसरून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला असल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.