Cyber Sakhi : ‘डिजिटल स्त्री शक्ती’ उपक्रमांतर्गत पाच हजार तरुणी होणार ‘सायबर सखी’

Five thousand young women to become 'Cyber ​​Sakhi' under 'Digital Stri Shakti' initiative : महाराष्ट्र राज्य महिला आयोग आणि रिस्पॉन्सिबल नेटिझम यांचा संयुक्त उपक्रम

एमपीसी न्यूज – महाराष्ट्र राज्य महिला आयोग आणि रिस्पॉन्सिबल नेटिझम यांच्या संयुक्त विद्यमाने ‘डिजिटल स्त्री शक्ती’ उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमाचा शुभारंभ मंगळवारी (दि. 21 जुलै) रोजी राज्याच्या महिला व बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांच्या हस्ते होणार आहे.

या उपक्रमांतर्गत मुंबईसह राज्यभरातील 10 शहरातील 5 हजार महाविद्यालयीन तरुणींना सायबर सुरक्षेचे मार्गदर्शन तसेच प्रशिक्षण वेबिनारच्या माध्यमातून देण्यात येणार आहे.

मोबाईल, इंटरनेटच्या वाढत्या वापरासोबतच महिलांविरोधातील सायबर गुन्हे, फसवणूक यातही वाढ होत आहे. मुलींना सायबर विश्वातील सुरक्षित वापर आणि वावर याकरिता प्रशिक्षित करण्यासाठी ‘डिजिटल स्त्री शक्ती’ उपक्रम हाती घेण्यात आला आहे.

यामध्ये 16 ते 25 वयोगटातील महाविद्यालयीन तरुणींना इंटरनेटचा सुरक्षित उपयोग, गैरप्रकार झाल्यास कायदेशीर बाबी, मानसिक परिणाम, तांत्रिक फसवणूक आदीबाबत तज्ज्ञांकडून मार्गदर्शन करण्यात येईल.

100 वेबिनारमधून राज्याच्या 10 शहरातील 5 हजार तरुणींना ‘सायबर सखी’ म्हणून प्रशिक्षित करण्यात येणार आहे. शुभारंभाचा वेबिनार उद्या, मंगळवारी सकाळी 11 वाजता होणार आहे.

यावेळी राज्याच्या महिला व बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर मार्गदर्शन करणार आहेत. घन:श्यामदास सराफ महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींसाठी आयोजित वेबिनारमधे सायबर क्षेत्रातील तज्ज्ञांसह मुंबई पोलिस सायबर शाखेच्या उपायुक्त डॉ. रश्मी करंदीकरही उपस्थित राहणार आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.