Cyclone Amphan: पश्चिम बंगालला एक हजार कोटींची तर ओदिशाला 500 कोटींची मदत – नरेंद्र मोदी

Cyclone Amphan: Rs 1,000 crore aid to West Bengal and Rs 500 crore to Odisha - Narendra Modi

एमपीसी न्यूज – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अम्फन चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर आज पश्चिम बंगाल व ओदिशाचा दौरा केला. यावेळी त्यांनी या ठिकाणच्या परिस्थितीची व नुकसानाची पाहणी केली. पश्चिम बंगालला एक हजार कोटी रूपयांची तर मृतांच्या कुटुंबीयांना दोन लाख आणि गंभीररित्या जखमी झालेल्या लोकांना एक लाख रूपयांची तात्काळ मदत जाहीर केली. पंतप्रधान मोदींनी ओदिशासाठी 500 कोटींची मदत जाहीर केली.

देशभरात करोनानं थैमान घातलेले असतानाच पश्चिम बंगाल आणि ओदिशावर अम्फन चक्रीवादळाचं संकट कोसळले आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी यांनी पश्चिम बंगाल व ओदिशाचा दौरा केला. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या समवेत त्यांनी पं. बंगालमधील चक्रीवादळगस्त भागांची हवाई पाहणी केली.

या हवाई पाहणीनंतर पंतप्रधान मोदी यांनी पश्चिम बंगालसाठी १००० कोटी रुपयांच्या मदतीची घोषणा केली. लोकांना मदत करण्यासाठी राज्य आणि केंद्र मिळून काम करत आहे. तत्काळ राज्याला कोणत्याही अडचणी येऊ नयेत यासाठी १००० कोटी रुपये भारत सरकारकडून उपलब्ध करून दिले जातील. सोबतच पंतप्रधान मदत निधीतून मृतांच्या कुटुंबीयांना २ लाख रुपयांची तर जखमींना ५० हजार रुपयांची मदत दिली जाईल, अशी घोषणाही यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली.

‘अम्फानच्या पार्श्वभूमीवर राज्य आणि केंद्र सरकारनं एकत्र काम करूनही आम्ही ८० जणांचे प्राण वाचविण्यात अपयशी ठरलो. आम्हाला याचं दु:ख आहे. ज्या कुटुंबांनी आपल्या जवळच्यांना गमावलंय त्यांच्या प्रती केंद्र आणि राज्य सरकारच्या संवेदना आहेत’ असंही आज पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पश्चिम बंगालच्या नागरिकांना संबोधताना म्हटलं.

मोदी यांनी जाहीर केलेल्या मदतीवर ममता बॅनर्जी कडाडल्या

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक हजार कोटींच्या मदत पॅकेजची घोषणा केलीय परंतु, यासंबंधी कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. हा पैसा कधीपर्यंत मिळेल, हेदेखील स्पष्ट करण्यात आलेले नाही. अम्फन महाचक्रीवादळामुळे राज्यात किमान एक लाख कोटींचे नुकसान झालेले असताना केंद्रातील भाजपचे सरकार फक्त एक हजार कोटींची मदत जाहीर केली आहे, या शब्दांत ममता बॅनर्जी यांनी तीव्र संताप व्यक्त केला. 56 हजार कोटी रुपये तर पश्चिम बंगालचे केंद्राकडे थकित आहेत, असेही ममता बॅनर्जी म्हणाल्या.

ओदिशाला 500 कोटी रुपयांचे पॅकेज

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अम्फान महाचक्रीवादळाचा तडाखा बसलेल्या ओडिशातील नुकसानग्रस्त भागाची हवाई पाहणी केली. पाहणी केल्यानंतर पंतप्रधान मोदींनी बैठकीत नुकसानीचा आढावा घेतला. या बैठकीत ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक, पेट्रोलियममंत्री धर्मेंद्र प्रधान आणि प्रताप चंद्र सारंगीही उपस्थित होते.

ओडिशामधील मदतकार्यासाठी भारत सरकार 500 कोटींच्या आर्थिक पॅकेजची घोषणा करत आहे. ओडिशाला या आपत्तीतून उभरण्यासाठी केंद्र सरकार सर्व मदत करेल. नुकसानीचा सखोल आढावा घेण्यासाठी सर्वेक्षण करण्यात येत आहे. तसंच नुकसानग्रस्त नागरिकांच्या पुनर्वसनासाठी योजना बनवण्यात येत आहेत, असे पंतप्रधान मोदी यांनी बैठकीनंतर बोलताना सांगितले. यासोबतच वादळामुळे मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबीयांसाठी प्रत्येकी दोन लाख रुपयांची आणि जखमींसाठी 50 हजार रुपयांची मदत जाहीर केली.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.