Cyclone Amphan’s Landfall: अम्फन चक्रीवादळ पं. बंगाल किनारपट्टीला धडकले, ताशी 160 कि.मी. वेगाने वारे

Cyclone Amphan's Landfall: Amphan Hit the coast of West Bengal with 160 km per hour High winds

एमपीसी न्यूज – बंगालच्या उपसागरात निर्माण झालेले चक्रीवादळ अम्फन आज (20 मे) दुपारी सव्वाचारच्या सुमारास पश्चिम बंगालमधील सुंदरबन येथे धडकले. त्यावेळी वादळाचा वेग प्रतितास 160 किमी होता. चक्रीवादळाचा केंद्रबिंदू कोणत्याही क्षणी किनारपट्टीला धडकू शकतो, असे भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या वतीने सांगण्यात आले आहे. पुढील 24 तास पश्चिम बंगाल, ओदिशासाठी महत्त्वाची ठरणार आहेत. पश्चिम बंगालमधील पाच लाख नागरिकांना तर ओदिशातील दीड लाख पेक्षा अधिक नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे.  हवामान विभागाने आठ राज्यांना ‘ऑरेंज अलर्ट’ दिला आहे. पं. बंगाल व ओदिशाच्या समुद्रकिनाऱ्यावरील जिल्ह्यांमध्ये हाय अलर्ट जाहीर करण्यात आला आहे.

अम्फन चक्रीवादळाचा फटका पश्चिम बंगाल, ओदिशा, त्रिपुरा, मिझोरम, मणिपूरसह तामिळनाडू, पुद्दुचेरी, आंध्र प्रदेश या राज्यांना बसण्याची शक्यता  आहे. त्या ठिकाणी संभाव्य नैसर्गिक संकटाचा सामना करण्यासाठी प्रशासन तसेच एनडीआरएफच्या तुकड्या सज्ज आहेत.

या वादळाच्या धडकण्याच्या वेळी हवेचा वेग 155 ते 165 किलोमीटर प्रतितास कायम राहील. तर अधूनमधून हा वेग 180 किलोमीटर प्रतितासपर्यंत वाढू शकतो, असा अंदाज हवामान खात्याने आधीच व्यक्त केला होता.

चक्रीवादळाचा धोका पाहता राज्य सरकारांसह केंद्र सरकारही सतर्क झाले आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याशी चर्चा केली. केंद्र सरकार शक्य ती सर्व मदत करेल, असे आश्वासन त्यांनी दिले. दुसरीकडे कोलकातामध्ये चक्रीवादळाचा परिणाम दिसू लागला असून पाऊस सुरु आहे. बंगालमध्ये भूस्खलनाची शक्यताही वर्तवली जात आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.