Pimpri news: शहरात रविवारी ‘सायक्लोथॉन’चे आयोजन

एमपीसी न्यूज – ‘स्वच्छ भारत-स्वस्थ भारत’ या केंद्र सरकारच्या कार्यक्रमांतर्गत  हवा-ध्वनी प्रदुषण टाळून इंधन बचती बरोबरच उत्तम आरोग्य राखण्यासाठी सायकल चालविण्याची गरज व महत्व पटवून देण्यासाठी उद्या (रविवारी) सायकल फेरी (सायक्लोथॉन)चे आयोजन करण्यात आले आहे.  

पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आणि लायन्स क्लब इंटरनॅशनल डिस्ट्रिक्ट 3234 डी-2 यांच्या संयुक्त विद्यमाने या सायकल फेरी आयोजन करण्यात आले आहे.  ही सायकल फेरी  सांगवी फाटा ते साई चौक (जगताप डेअरी) ते सांगवी फाटा या बीआरटीएस मार्गावर आयोजित करण्यात आली असल्याचे बीआरटीएसचे प्रवक्ते विजय भोजने यांनी सांगितले.

आजच्या तरूण पिढीमध्ये कोव्हीड साथीच्या काळात व्यायामाचे महत्व त्याच बरोबर इंधन बचतीचा संदेश रूजवण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. आमदार लक्ष्मण जगताप, महापौर उषा ढोरे, महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर, पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश, कमांडंट 330 इंन्फास्ट्री ब्रिग्रेड व लायन्स क्लबचे प्रांतपाल लायन अभय शास्त्री यांच्या हस्ते सायकल फेरीचे (सायक्लोथॉन) उद्घाटन  होणार आहे.

पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश यांचा आंतरराष्ट्रीय ट्रायथॅलॉन स्पर्धा पूर्ण केल्याबाबत सत्कार करण्यात येणार आहे. वेणुगोपाल राव, जय पाठक, श्रीपाद शिरोडे, अरूण पोटे यांचाही सत्कार करण्यात येणार आहे.  पिंपरी-चिंचवड व पुणे परिसरातील सायकल क्लब सहभागी होणार आहेत. या कार्यक्रमात मोठ्या प्रमाणावर पिंपरी-चिंचवडकरांनी सहभाग नोंदवून उर्जा बचत व हवा-ध्वनी प्रदुषण टाळून-इंधन बचतीचा संदेश समाजात रूजवावा, असे आवाहन पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.