D. Phalake Award : थलायवा ‘रजनीकांत’ यांना दादासाहेब फाळके पुरस्कार 

एमपीसी न्यूज – दाक्षिणात्य सुपरस्टार अभिनेते रजनीकांत यांना ‘दादासाहेब फाळके पुरस्कार’ जाहीर करण्यात आला आहे. सिनेसृष्टीत सर्वात मानाचा असलेल्या दादासाहेब फाळके पुरस्काराने रजनीकांत यांना सन्मानित करण्यात येणार आहे. केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी या पुरस्काराची घोषणा केली आहे.

सिनेसृष्टीत महत्वाची कामगिरी करणाऱ्या अभिनेत्याला दरवर्षी दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित केलं जात. सुपरस्टार रजनीकांत यांना 51 वा दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. प्रकाश जावडेकर यांनी दिल्लीतील पत्रकार परिषदेत याची घोषणा केली.

‘देशातील सर्व भागातील चित्रपट निर्माते, अभिनेते, अभिनेत्री, गायक, संगीतकार यांना दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरवण्यात आले आहे. आज महान नायक रजनीकांत यांना यंदाचा दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर करून आम्हाला आनंद झाला आहे.’ असे ट्वीट प्रकाश जावडेकर यांनी केले आहे.

रजनीकांत यांचा जन्म 12 डिसेंबर 1950 रोजी बेंगलुळूमधील एका मराठी कुटुंबात झाला होता. एका गरीब कुटुंबात जन्मलेल्या रजनीकांत यांनी कठोर परिश्रम आणि संघर्षानंतर टॉलीवूडमध्ये विशेष स्थान मिळवलं. रजनीकांत यांनी एकाहून एक हिट सिनेमे दिले आहेत. दाक्षिणात्य सिनेसृष्टीपासून ते बॉलिवूडपर्यंत आजही त्यांचा जलवा कायम आहे. रजनीकांत हे 12 वे दाक्षिणात्य कलाकार आहेत ज्यांना हा पुरस्कार मिळाला आहे. यापूर्वी डॉ.राजकुमार, अक्किनेनी नागेश्वरा राव, के. बालाचंदर या ज्येष्ठ कलाकारांना हा पुरस्कार देण्यात आला आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.