Pune : दगडूशेठ गणपतीच्या दर्शनाला 100 हून अधिक तृतीयपंथी 

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट ; अलंकारांनी सजून पारंपरिक वेशभूषेत केली तृतीयपंथीयांनी श्रीं ची आरती

एमपीसी न्यूज : सामान्य स्त्री-पुरुषांप्रमाणेच समाजातील महत्त्वाचा मात्र बाजूला असलेला घटक म्हणजे तृतीयपंथी. गणपती बाप्पाच्या भेटीची ओढ जशी सामान्य भक्ताला असते, तशी या तृतीयपंथींच्या मनातील बाप्पाच्या भेटीची ओढ आज दगडूशेठ गणपतीसमोर पहायला मिळाली. विविधांगी अलंकारांनी सजून आपल्या पारंपरिक वेशभूषेत 100 हून अधिक तृतीयपंथीयांनी दगडूशेठ गणपतीचे मनोभावे दर्शन घेत आरतीही केली. 

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळ तर्फे ट्रस्टच्या 126 वर्षानिमित्त आयोजित गणेशोत्सवात 100 हून अधिक तृतीयपंथीयांनी गणपतीचे दर्शन घेतले. यावेळी गणेश पेठेतील मंगलामुखी किन्नर चॅरिटेबल ट्रस्टच्या रंजिता नायक, लता नायक, शोभा नायक, दगडूशेठ ट्रस्टचे महेश सूर्यवंशी, माणिक चव्हाण, सुनील रासने, हेमंत रासने, राजू पायमोडे, उल्हास भट, मंगेश सूर्यवंशी, तुषार रायकर, अमोल चव्हाण, अक्षय गोडसे, अमोल केदारी यांसह विश्वस्त व कार्यकर्ते उपस्थित होते. मंगलामुखी किन्नर चॅरिटेबल ट्रस्टच्या पुणे, मुंबई, गोरखपूर येथील तृतीयपंथीयांनी आरती केली.

मंगळवारी दिवसभरात माजी मंत्री दिलीप वळसे पाटील, माजी सांस्कृतिक मंत्री हर्षवर्धन पाटील, अभिनेता स्वप्निल जोशी यांसह विविध क्षेत्रातील दिग्गजांनी गणपतीचे दर्शन घेतले. यावेळी ट्रस्टतर्फे मान्यवरांचा सन्मान करण्यात आला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.