Pimpri : कार्यकर्त्यांच्या उत्साहात दहीहंडी उत्सव

एमपीसी न्यूज – कार्यकर्ते आणि गोविंदांच्या उत्साहात पिंपरी चिंचवड शहरात दहीहंडी उत्सव पार पडला. शहरातील बहुतांश चौकात डीजे आणि दहीहंडीचा उत्सव पाहायला मिळाला. बहुतांश दहीहंडी उत्सव मंडळांनी सिनेसृष्टीतील कलाकारांना बोलावले होते. त्यामुळे कार्यकर्त्यांच्या उत्साहात चांगलीच भर पडली. पोलिसांनी संपूर्ण उत्सवात चोख बंदोबस्त ठेवला.

प्राधिकरणातील लाल बहादूर शास्त्री चौकात नगरसेवक राजू मिसळ आयोजित राष्ट्रवादीची दहीहंडी झाली. या दहीहंडी उत्सवाला सायंकाळी सातच्या सुमारास सुरुवात झाली. राष्ट्रवादी दहीहंडी उत्सवाला महापौर राहुल जाधव, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे, नगरसेवक राजू मिसाळ, निलेश पांढरकर, शिरीष पांढरे आणि राजकीय, सामाजिक, क्रीडा, शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. आवर्तन ढोल ताशा पथकाने दहीहंडी उत्सवात रंग भरला. ब्राम्हणदेव गोविंदा पथक, चेंबूर या पथकाने सलामी दिली.

भोसरीमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात योगेश लांडगे आयोजित दहीहंडी उत्सव साजरा करण्यात आला. या उत्सवासाठी आमदार महेश लांडगे, संदीप शेलार, सिनेअभिनेते गुलशन ग्रोवर, सिनेअभिनेत्री, अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड, मुख्य आयोजक योगेश लांडगे, नगरसेवक संतोष भोंडे तसेच विविध क्षेत्रातील कार्यकर्ते उपस्थित होते. सुनिलमामा गोविंदा पथक, मुंबई या पथकाने सलामी दिली. तर अष्टविनायक गोविंदा पथकाने पहिली आणि साईनाथ गोविंदा पथकाने दुसरी दहीहंडी फोडली.

विद्युत रोषणाई आणि डीजेच्या तालावर तरुणांनी थिरकण्याचा आनंद घेतला. उत्सव काळात पिंपरी चिंचवड महापालिकेचे महापौर राहुल जाधव, अप्पर पोलीस आयुक्त मकरंद रानडे तसेच वरिष्ठ पोलीस अधिका-यांनी शहरातील विविध दहीहंडी पथकांची पाहणी केली. उत्सवात कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी शहरात सर्वत्र चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.