Chinchwad News : दहीहंडीच्या कार्यक्रमांना पोलिसांकडून परवानगी नाही; शहरात टाळेबंदीची होणार कठोर अंमलबजावणी

Dahihandi events are not permitted by the police; There will be strict enforcement of lockdown in the city.

एमपीसी न्यूज – दहीहंडी, गोपाळकाला या कार्यक्रमासाठी पोलिसांकडून कुणालाही परवानगी देण्यात येणार नाही. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू असलेल्या टाळेबंदीची कठोर अंमलबजावणी केली जाणार आहे. विनाकारण घराबाहेर फिरताना आढळल्यास त्या नागरिकांवर देखील पोलीस कारवाई करणार आहेत.

मंगळवारी (दि. 11) श्रीकृष्ण जन्माष्टमी आणि बुधवारी (दि. 12) दहीहंडी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड शहरात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. अति वरिष्ठ अधिका-यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना टाळेबंदीची कठोर अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले आहेत.

कोविड – 19 च्या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय हद्दीत सीआरपीसी कलम 144 प्रमाणे जमावबंदी आदेश सुरु आहेत. त्यानुसार सर्व धार्मिक स्थळे नागरिकांसाठी बंद राहणार आहेत.

सर्व प्रकारचे धार्मिक कार्यक्रम, सभा, मेळावे यांना मनाई आहे. त्यामुळे श्रीकृष्ण जन्माष्टमी व दहिहंडी निमित्त पुजा व आरतीसाठी मंदिरे उघडणार नाहीत.

शहरातील प्रत्येक धार्मिक स्थळावर पोलीस बंदोबस्त असणार आहे. कृष्ण मंदिरात आरती, भजन करणे तसेच सार्वजनिक ठिकाणी एकत्र जमणे, फटाके फोडणे, मिरवणूक काढणे, प्रतिमा पूजन यांसारख्या कार्यक्रमांना देखील बंदी घालण्यात आली आहे.

विविध मंडळे, मंदिर समित्यांचे पदाधिकारी यांची बैठक घेऊन याबाबत पोलिसांनी संबंधितांना निर्देश दिले आहेत. गुड मॉर्निंग गस्त करताना धार्मिक स्थळ तसेच त्याच्या आजुबाजुच्या परिसराची पाहणी करुन आक्षेपार्ह काही आहे का? याबाबत खात्री केली जाईल. तसेच याबाबत विशेष सतर्कता बाळगली जाणार आहे.

संवेदनशील ठिकाणी ज्यादा कुमक

शहरातील कुदळवाडी, ओटास्कीम यांसारख्या मिश्र लोकवस्तीच्या ठिकाणी तसेच शहरातील सर्व संवेदनशील ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. काही पोलीस पथकांची वेळोवेळी पेट्रोलिंगही होणार आहे. आक्षेपार्ह प्रकार समोर येताच त्यावर कठोर कारवाई केली जाणार आहे.

पोलीस करणार उपद्रवी, समाजकंटकांची यादी तयार

प्रत्येक पोलीस ठाण्याच्या हद्दीतील उपद्रवी आणि समाजकंटकांची पोलीस यादी तयार करणार आहेत. त्यात गुन्हेगारांची वेगळी आणि राजकिय पार्श्वभूमी असलेल्यांची वेगळी यादी केली जाणार आहे. पोलीस आवश्यकतेनुसार त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करणार आहेत.

सोशल मीडियावर सायबर सेलचा वॉच

सायबर गुन्हे शाखा फेसबुक, वॉटसअप व सोशल मिडीयावर पसरणा-या अफवांवर लक्ष ठेऊन आहे. सोशल मीडियावर आक्षेपार्ह  पोस्ट, प्रकार आढळल्यास तात्काळ संबंधितांवर कारवाई करण्यात येणार आहे.

संवेदनशील ठिकाणचा बंदोबस्त कॅमेऱ्याच्या निगराणीत

संवेदनशील ठिकाणी ज्यादा पोलीस बळ लावण्यात येईल. तसेच या बंदोबस्ताचे विडिओ चित्रीकरण देखील केले जाणार आहे. नाकाबंदी करून विनाकारण दुचाकीवर फिरणा-यांवर कारवाई केली जाणार आहे. बॅरीकेट्स, विडिओ कॅमेरा, ड्रोन, पीए सिस्टीम यांचा आधार घेत पोलीस स्मार्ट बंदोबस्त करणार आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.