Pune : दलित साहित्यिकांची उपेक्षा होऊ देणार नाही – रामदास आठवले

'झुलवाकार' उत्तम बंडू तुपेंना हक्काच्या घराची किल्ली सुपूर्त

एमपीसी न्यूज – “लेखक-साहित्यिक चळवळी बळकट करण्यासाठी आपले आयुष्य लावतात. मात्र, अनेक साहित्यिकांना वृद्धापकाळात हलाखीचे जीवन जगावे लागते. काही दिवसांपूर्वी झुलवाकार ज्येष्ठ साहित्यिक उत्तम बंडू तुपे यांच्या हलाखीच्या जगण्याची वस्तुस्थिती माध्यमांनी समोर आणली होती. त्यांनतर समाजातील विविध स्तरातून त्यांना मदतीचा ओघ सुरू सुरू झाला. यापुढे दलित साहित्यिकांची उपेक्षा होणार नाही, यासाठी आपण स्वतः लक्ष घालणार आहोत,” असे मत केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले.

उपमहापौर डॉ.सिद्धार्थ धेंडे यांच्या पुढाकारातून ‘झुलवाकर’ उत्तम बंडू तुपे यांचे दुमजली घर उभे राहिले आहे. त्या घराचे हस्तांतरण रामदास आठवले यांच्या हस्ते तुपे यांच्याकडे करण्यात आले. राज्याचे सामाजिक न्याय राज्यमंत्री अविनाश महातेकर, आमदार विजय काळे, नगरसेवक विजय शेवाळे, नगसेविका स्वाती लोखंडे, रिपाइंचे शहराध्यक्ष अशोक कांबळे, परशुराम वाडेकर, संपत जाधव, आयुब शेख, शैलेश चव्हाण, महिपाल वाघमारे, बसवराज गायकवाड यांच्यासह विविध पक्ष संघटनांचे कार्यकर्ते व स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

रामदास आठवले म्हणाले, “उपेक्षित, दलित माणसाचे दुःख, वेदना तुपे यांनी आपल्या साहित्यातून मांडल्या. त्यांच्या हलाखीच्या जीवनाकडे सर्वांचे लक्ष उशिरा गेले. परंतु यापूढे कोणत्याही दलित साहित्यिक विचारवंतांची उपेक्षा होऊ देणार नाही. झुलवा, काट्यावरची पोटं यासारख्या असंख्य पुस्तकातून तूपेंनी साहित्यसेवा केली आहे. अशा थोर साहित्यिकाचा मला अभिमान आहे. तसेच यापुढेही आम्ही त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार आहोत.”

डॉ.सिद्धार्थ धेंडे यांनी प्रास्ताविकात तुपे यांची पूर्व परिस्थिती सांगून पुणे महापालिका आणि महाराष्ट्र शासनाकडून त्यांना सर्व प्रकारची मदत मिळण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.